पुणे ! ग्राहकांना सेवा आणि हक्काबाबत मार्गदर्शन गरजेचे- अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख
पुणे दि.१५- ग्राहकाला हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा यासाठी जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांना कायद्यासोबतच सेवा आणि आपल्या हक्काबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, लीड बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले, वस्तू खरेदी करताना ग्राहक कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही, वस्तूची ऑनलाईन खरेदी करतानाही त्याने सावधगिरी बाळगावी यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. ‘राईट टू सर्व्हीस’ अंतर्गत आपण अधिकाधिक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. ९ हजारापेक्षा अधीक रास्त भाव धान्य दुकाने आयएसओ मानकाप्रमाणे कार्य करीत आहेत. पुरवठा विभागाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सेवा कशा देता येतील, सेवेचा दर्जा, पारदर्शकता, मुदतीत सेवा कशी देता येईल, यासाठी सेवा पुरविणाऱ्या प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आपल्या दैनदिन कामकाजात सुधारण करत वेळेत सेवा देण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही श्री.देशमुख यांनी केले.
श्री. जावळीकर यांनी म्हणाले, ग्राहकाला आपल्या सहा हक्काविषयी माहिती आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणीचाही विचार केला तर ग्राहकांच्या कल्याणकारी कामांची ही महत्त्वपूर्ण सुरूवात असेल. कोरोनाकाळातही ग्राहकांसाठी ऑनलाइन सुनावणी सुरू केली. आपण तंत्रज्ञानाचा बदल स्विकारला आहे, त्यात अचुकता व पारदर्शकता महत्त्वाची आहे. ग्राहक शिक्षणात शासकीय विभागांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री.कुलकर्णी म्हणाले, कोरोना कालावधीत पुणे विभागातील सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे १ लाख ८० हजार टन धान्य वितरण करण्यात आले. ९ हजारापेक्षा अधीक दुकानांचे स्वरूप बदलेले आहे. ८० गोदामांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी श्री.झेंडे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची सविस्तर माहिती दिली. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय आयोगाच्या माध्यमातून तक्रारींची दखल घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अन्नधान्य निरीक्षक रवीकिरण शेटे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. श्रीमती माने व श्री. ढोले यांनीही विचार व्यक्त केले.
*ग्राहक जागृती प्रदर्शनाचे उदघाटन*
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ग्राहक जागृती प्रदर्शनाचे उदघाटन अपर जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, वैध मापन शास्त्र, अन्न व नागरी पुरवठा, महावितरण, पीएमपीएल, बँक ऑफ महाराष्ट्र, डाक विभाग, एचपी गॅस, भारत गॅस, इंडेन गॅस, इंडियन ऑईल, बीएसएनएल आदी विविध विभागांनी ग्राहक जागृतीसाठी स्टॉल उभे केले आहेत. ग्राहक मंचाच्यावतीनेही मार्गदर्शन करण्यात येत आहे.