पुणे ! 9 मार्च रोजी फेरफार अदालतीचे आयोजन
फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात - जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आवाहन
पुणे : आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर मार्च 2022 मधील फेरफार अदालत 9 मार्च 2022 रोजी आयोजित केली जाणार आहे.
फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी 9 मार्च रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या 11 नोव्हेंबर 2021 च्या शासननिर्णयान्वये लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येवून जनतेच्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या सूचना आहेत.
कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील महिन्यात 9 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या अदालतीमध्ये 3 हजार 554 इतक्या नोंदी निर्गत झालेल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात 3 मार्च 2022 अखेर मुदत पूर्ण झालेल्या 7 हजार 155 नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केलेले असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.