Type Here to Get Search Results !

शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील दहा गावांमधील शेती पाण्याअभावी येणार धोक्यात - हर्षवर्धन पाटील

शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील दहा गावांमधील शेती पाण्याअभावी येणार धोक्यात - हर्षवर्धन पाटील
जलसंपदाने दिले तलावातून पाणी उचलीचे तब्बल 65 परवाने 
 
शेतकरी रस्ता रोको, धरणे आंदोलन करणार
  
निमगाव केतकी प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ,
ब्रिटिशकालीन शेटफळ तलावातून सुमारे 110 वर्षांपासून बावडा परिसरातील लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेतीला पाणी मिळत आहे. मात्र जलसंपदा विभागाने प्रथमच तलावांमधून थेट पाणी उचलीचे तब्बल 65 पाणी परवाने दिले आहेत. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रचंड उपसा होऊन, लाभक्षेत्रातील 10 गावातील शेती पाण्याअभावी पुर्णपणे धोक्यात येणार आहे. सदरचे पाणी परवाने सध्याच्या राज्यकर्त्यांनी बेकायदेशीर दिलेले असल्याने या निर्णयाविरोधात जलसंपदाच्या वकीलवस्ती कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे रास्ता रोको, धरणे आंदोलन होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे रविवारी (दि. 6 ) दिली.
        शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या वतीने बावडा येथे लाभ क्षेत्रातील 10 गावातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच 10 गावातील शेतकरी उपस्थित होते.
   शेटफळ तलावामुळे शेटफळ, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, लाखेवाडी, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी या 10 गावांमधील शेती बागायती झाली आहे. तसेच परिसरातील अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी या तलावातून पाणी उचलण्यासाठी नियम बाजूला ठेऊन पाणी परवाने दिले आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठा लवकर संपुष्टात येऊन लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेतीपिके पाण्याअभावी धोक्यात येणार आहेत. या मोठ्या धोक्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण होत आहे. जलसंपदाच्या या निर्णयाविरुद्ध कृती समितीच्या वतीने अनेक पातळ्यांवर लढा द्यावा लागणार आहे. जलसंपदाच्या या चुकीच्या निर्णयाविरोधात लवकरच वकीलवस्ती कार्यालयासमोर 10 गावातील शेतकर्‍यांचे रास्ता रोको, धरणे आंदोलन होणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
          याबैठकीत बोलताना अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले की, तलावातून पाणी उपसा परवाने नियमबाह्य दिल्याने लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेतीचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लढा दिल्यास जलसंपदाच्या या मनमानी निर्णयाविरोधात यश नक्की मिळणार आहे. यावेळी कृती समितीच्या वतीने प्रास्ताविक प्रा.पंडितराव पाटील यांनी केले. तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेव घाडगे यांनी आभार मानले. 


बावडा येथे शेटफळ तलाव बचाव कृती समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील. यावेळी आप्पासाहेब जगदाळे व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test