इंदापूर येथे राष्ट्रवादी च्या वतीने परिवार संवाद यात्रेनिमित्त होणार जाहीर सभा
इंदापूर तालुका प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - इंदापूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा" आज दिनांक २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:०० वाजता शहा संस्कृतिक भवन इंदापूर येथे येणार आहे.
या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने स्वतः राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड.मेहबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आदी प्रमुख मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
...त्या २२ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात जलसंपदा मंत्री काय बोलणार ?
उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील २२ दुष्काळी गावांना पाच टीएमसी पाणी देण्याच्या ऐतिहासिक निर्णय झाला होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासाठी खूप प्रयत्न केले होते. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध सोलापूर जिल्ह्यामधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात उघड नाराजी व्यक्त करीत या निर्णयावर आक्षेप घेतला होता. सोलापूर मधून प्रचंड विरोधाला भरणे यांना सामोरे जावे लागले होते.सोलापूर मधील शेतकरी संघटना, शेतकरी,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या निर्णयाविरोधात आंदोलन उभा करून हा निर्णय जलसंपदा विभागात रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यावेळी दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापूर मध्ये जनआंदोलन झाले होते.
आता प्रथमच जलसंपदा विभागाचे मंत्री जयंतराव पाटील हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या २२ गावांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात ते काय बोलणार ? या वरती काय तोडगा काढतील ? याकडे तमाम २२ गावांच्या शेतकऱ्यांसह इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.