पर्यटक मार्गदर्शकांसाठी जुन्नर येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
पुणे,पर्यटन संचालनालय व भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्था (आयआयटीटीएम), ग्वाल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथे २१ फेब्रुवारीपर्यंत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये पर्यटकांना पर्यटनस्थळाची इत्यंभूत माहिती देण्यासाठी तसेच त्यांची भेट आनंददायी व अविस्मरणीय होण्यासाठी ५० नवीन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा. पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी माडांव्यात याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी हे तज्ज्ञ प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व पुढे पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय पयर्टन कार्यालयाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे.