बारामती, दि.१९: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर, कळंब व रणगाव या गावातील ११ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, पंचायत समितीच्या सदस्या शैला फडतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, कामगार नेते शिवाजी अटकाळे, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. मुंडे म्हणाले, उद्योगामुळे या भागाची प्रगती झाली आहे. कामगारांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न केले जातील. वालचंद नगर मध्ये देशाला संरक्षण देण्यासाठी जी सामुग्री बनवली जाते त्यातील काही भाग येथे बनवला जातो याचा अभिमान वाटतो. वालचंदनगर चे गतवैभव परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले, कोरोनाचे संकट असतांनाही इंदापूर तालुक्यासाठी निधी कमी पडू दिला नाही, त्यामुळेच येथे विविध विकास कामे होत आहेत.
वालचंदनगरसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाकडी निंबोडी येथे पाण्याची योजना राबवून पाण्याचा दुष्काळ कामयचा नष्ट करायचा आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कायमस्वरुपी ऊसाचे पीक कसे राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.