पवना नदी संवर्धन व शुद्धीकरणसाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने एक महत्वकांक्षी घेतला प्रकल्प.
पुणे,पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी असणा-या पवना नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पवना नदी संवर्धन व शुद्धीकरण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने एक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
किवळे गावापासून पवना नदी प्रदूषित होण्यास सुरुवात होते. मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत मिसळल्याने नदी प्रदूषण होत असल्याचे रोटरी टीमने केलेल्या अभ्यासात दिसून आले. देहूरोड परिसरात असणाऱ्या अपुऱ्या ड्रेनेज आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प यांच्या अभावाने नाल्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. शिवाय हेच पाणी पिंपरी चिंचवड शहरवासीयांना रावेत येथे पंपिंग करून फिल्टर करून पिण्यास जाते त्यामुळे फिल्टर करण्याचा खर्च ही अधिक होतो.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने सिनर्जी पार्टनर रोटरी क्लब ऑफ निगडी आणि वॉल्व वर्क्स इंडियाच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून किवळे येथील सांडपाणी नाला नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरण (Ecological Restoration) कामाचा सोमवारी (दि.21) शुभारंभ करण्यात आला. यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विशेष सहकार्य व लमिनोन कंपनीचे मार्गदर्शन लाभले.