राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते निरवांगी परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन
बारामती, दि. 18 : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी व पिटकेश्वर या गावातील ३० कोटी ८० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन गुरुवारी सायंकाळी करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे यावेळी म्हणाले, इंदापूर तालुक्यातील विकासकामांसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. गोरगरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. सामान्य माणसाच्या घरापर्यंत पाणी मिळावे आणि नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तालुक्यातील विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.