इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - शनिवार दि.19 छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना असंख्य अडचणी आल्या. मात्र अडचणी आहेत म्हणून महाराज कधीही निराश झाले नाहीत. तर जिद्द, चातुर्य व बुद्धीचा वापर करून अडचणींवरती मात करीत स्वराज्याची स्थापना केली. भय हा शब्द शिवाजी महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता, असे गौरवोद्गार माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
बावडा येथे शिवछञपती प्रतिष्ठान व शिवाजी तरूण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ( दि.19) आयोजित शिवजयंती कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक लढाया महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. आग्र्याहून सुटका हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. महाराजांनी सर्व जाती व धर्मांना बरोबर घेऊन रयतेसाठी स्वराज्याची उभारणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतल्यास आपण आयुष्याच्या लढाईला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो. त्यांनी समाजिक एकोप्याने राहण्याचे संस्कार आपणास दिले आहेत. शिवाजी महाराज हे देशातील युवकांचे प्रेरणास्ञोत बनले आहेत, असे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
बावडा गावात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार आहे. त्यासाठी मुंबईत पुतळा बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तसेच पुतळा उभारणीला परवानगी मिळणेसाठी माझी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे बरोबर बैठक झाली आहे, अशी माहितीही भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
याप्रसंगी समाजभूषण डाॅ.लक्ष्मण आसबे, कु. वैष्णवी गायकवाड यांचे शिवचरित्रावरती व्याख्यान झाले. प्रास्ताविक विजयराव घोगरे यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, अशोकराव घोगरे, प्रशांत पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर निलाखे तर आभार प्रतीक घोगरे यांनी मानले.