Type Here to Get Search Results !

कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे पणन संचालकांचे आवाहन

कृषि पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे पणन संचालकांचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजार भावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून स्वनिधीतून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद लाभत असून 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झालेल्या नव्या हंगामामध्ये राज्यातील 70 बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले आहे

पणन मंडळ हे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार 1990 पासून ही योजना राबवत आहे. दरवर्षी ही योजना ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत बाजार समितींमार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी पणन मंडळामार्फत राबविली जाते. तूर, मूग ,उडिद, सोयाबीन, सूर्यफुल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी, हळद आदी शेतमालासाठी तारण कर्ज देण्यात येते.

या योजनेअंतर्गत बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्क्यापर्यंतची रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना तारण कर्ज स्वरुपात बाजार समितीमार्फत उपलब्ध करुन देण्यात येते. 

या योजनेअंतर्गत सहा महिन्यांच्या आत ज्या बाजार समित्या तारण कर्जाची परतफेड करतात अशा बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत पणन मंडळाकडून दिली जाते. तसेच ज्या बाजार समित्या स्वनिधीतून तारण कर्ज योजना राबवितात त्यांना त्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रक्कमेवर 3 टक्के व्याज सवलत/अनुदान स्वरूपात देण्यात येते. एखादी बाजार समिती निधी अभावी ही योजना राबविण्यास असमर्थ असल्यास पणन मंडळाकडून अशा बाजार समित्यांना 5 लाख रुपये अग्रिम दिला जातो.

शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाची प्रतिपूर्ती बाजार समित्यांच्या मागणीनुसार बाजार समित्यांना करण्यात येते. 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झालेल्या नव्या हंगामामध्ये राज्यातील 70 बाजार समित्यांनी या योजनेमध्ये भाग घेऊन 65 कोटी 57 लाख इतक्या किंमतीचा 1 लाख 50 हजार क्विंटल पेक्षा जास्त शेतमाल तारणात स्वीकारला असून 37 हजार कोटीपेक्षा जास्त कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. कृषी पणन मंडळामार्फत बाजार समित्यांच्या मागणीनुसार साधारणत: 7 कोटी रुपयांची प्रतिपुर्ती बाजार समित्यांना केलेली आहे.

*“शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास वाढीव बाजारभाव मिळत आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असून बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढून समित्यांच्या उत्पन्नातही वाढ होत असल्याने योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चालू हंगामात या योजनेमुळे सोयाबीनने बाजारभाव स्थीर राहून उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. पणन मंडळामार्फत या योजनेसाठी एक स्वतंत्र संगणक प्रणाली विकसीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे बाजार समित्या पणन मंडळाकडे त्वरीत प्रस्ताव सादर करु शकतात तसेच या योजनेमध्ये अधिक गतीमानता प्राप्त झालेली आहे. राज्यातील बाजार समित्यांनी या अधिकाधीक योजनेमध्ये सहभाग घ्यावा”- सुनिल पवार, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test