Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालय येथे 'सावित्री महोत्सव ' चे आयोजन

मु.सा.काकडे महाविद्यालय ,सोमेश्वरनगर. येथे ' सावित्री महोत्सव ' चे  आयोजन

सोमेश्वरनगर , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सोमवार दि 14 फेब्रुवारी 2022 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मु.सा.काकडे महाविद्यालय, सोमेश्वनगर( ता बारामती) मधील विद्यार्थी विकास मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने  सोमवार दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी ' सावित्री महोत्सवा ' चे अायोजन करण्यात अाले होते.
           क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा या हेतूने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याच्या आशयावर आधारित विशेष परिसंवाद आयोजित केला होता.या परिसंवादात खालील अभ्यासकांनी आपले विचार मांडले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. मृणालिनी यादव मोहिते यांनी  'सावित्रीबाई फुले यांचा शैक्षणिक विचार ' या विषयावर मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्यातून चालत आलेल्या वैचारिक वारशावर प्रकाश टाकला.
     प्रा.डॉ.कल्याणी जगताप यांनी ' सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य ' या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर विशेषत्वाने प्रकाश टाकला, तसेच सावित्रीबाईंना करावा लागणारा संघर्ष आपल्यासाठी कसा प्रेरणादायी आहे हे सोदाहरण सांगितले.
             उपप्राचार्य प्रा. डॉ. जया कदम यांनी ' सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील समतेचा विचार' या विषयावर व्याख्यान देताना सांगितले की , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा   समतेचा विचार केवळ सांगून व बोलून उपयोग नाही तर तो प्रत्यक्ष कृतीत उतरला पाहिजे. तरच या कार्यक्रमाचे फलित आहे. अशी परखड मांडणी त्यांनी केली.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी केलेल्या क्रांतीचे विश्लेषण केले. हे विश्लेषण करत असताना महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , छत्रपती शाहू महाराज , महाराजा सयाजीराव गायकवाड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा वैचारिक वारसा अत्यंत नेमकेपणाने उलगडून दाखविला.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विद्यार्थी विकास अधिकारी उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी  ' सावित्री महोत्सव ' आयोजन करण्यात पाठीमागची भूमिका स्पष्ट केली .या कार्यक्रमासाठी  उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण ताटे देशमुख , प्रा. जवाहर चौधरी , प्रा.डॉ.संजू जाधव तसेच सर्व प्राध्यापक , सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण परिसंवादाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अच्युत शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test