म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपावा
-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.२६: सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास असल्याने म्हाडाच्या घरासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. सर्वसामान्य नागरिकांचा हा विश्वास म्हाडाने जपावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या २७०३ नवीन सदनिका व ५८ व्यापारी संकुलासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात गरजूंना घर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कोरोना संकटकाळात मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उर्जितव्यवस्था मिळाली. सर्वांना हक्काचे घर मिळावी यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी घरे’ कार्यक्रमांतर्गत सर्वांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न आहे.
कोरोना संकटकाळातदेखील म्हाडाने मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून दिली. म्हाडाच्या घरासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. म्हाडाच्या पारदर्शक कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावर विश्वास आहे. म्हाडाच्या घरामुळे गरजूंच्या घराची स्व्पनपुर्ती होते. सर्व सोईसुविधायुक्त घरे देण्यासाठी देण्यासोबतच म्हाडाने पुणे शहराच्या विकासासाठी आणखी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुणे शहराची राज्यात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशी ओळख आहे. देशातही ही ओळख निर्माण करू, असेही श्री. पवार म्हणाले.