Type Here to Get Search Results !

‘कृषिक’ कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट

‘कृषिक’ कृषी तंत्रज्ञान सप्ताहाला कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट 
       
बारामती दि. 12 : कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषिक तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त कृषिमंत्री दादा भुसे आणि जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी विविध उपक्रमांना भेट देवून पाहणी केली.
           यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राहुरी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, कृषि महाविद्यालयाचे प्रा. निलेश नलवडे आदी उपस्थित होते. 
         कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी कृषिक तंत्रज्ञान सप्ताहातील नाविन्यपूर्ण स्टार्टअप व तंत्रज्ञान दालनाचे उद्घाटन करून खासदार पवार यांच्या समवेत भाजीपाला गुणवत्ता केंद्र, महिला बचत गट उत्पादन प्रकल्प, स्टार्टअप इनोव्हेशन व पीएमएफएमइ दालन, फूड प्रोसेसिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग ब्रँडिंग इत्यादी ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली. यावेळी   महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे यांनी वेअर हाऊस मॉडेलचे सादरीकरण केले.  
           यावेळी श्री. भुसे म्हणाले की, बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्ट सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी लावलेल्या रोपाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. शेती क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाची माहिती या ठिकाणी उपलब्ध होत आहे.  नवीन संशोधक तयार करण्याचे काम  या ठिकाणी होत आहे. याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे. 

कृषि विज्ञान केंद्रातील प्रदर्शनाप्रमाणे राज्यात इतरत्रही प्रात्यक्षिकावर आधारीत प्रदर्शन आयोजित करण्याबाबत कृषि विद्यापीठ आणि कृषि महाविद्यालये यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. पीक विमा योजनेत  सकारात्मक बदल करण्यात येत आहे.  शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्यादृष्टीने "विकेल ते पिकेल" ही संकल्पना राबविण्यात येत आहे. 
शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते गतीने सोडवण्यासाठी विविध कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहेत. ‘बियाणे संपन्न महाराष्ट्र’ हे ब्रीद स्विकारून बियाण्याबाबत राज्य स्वयंपूर्ण करण्याचे प्रयत्नदेखील करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.  कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करुन दिली जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. 
       श्री.भुसे यांनी कृषि महाविद्यालयातील ‘इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर’ची पाहणी केली. त्यांच्या हस्ते  केंद्र  सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेअंतर्गत इन्क्युबेशन सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले.
                                               

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test