दिव्यांग व्यक्तींना महाशरद पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
पुणे, दि. 15: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी महाशरद पोर्टल सुरु करण्यात आले असून त्यांनी https://www.mahasharad.in या पोर्टल वर नोदंणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.
हे पोर्टल म्हणजे शासनाचा मंच (प्लॅटफॉर्म) असून त्यावर नोंदणीद्वारे राज्यातील दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाद्वारे व्याख्या केलेल्या दिव्यांग व्यक्तींना मदत तसेच सहाय्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करता येणार आहे. या पोर्टलवर राज्यातील दिव्यांग नागरिक सुलभतेने आपली नोंदणी करु शकतात.
महाशरद पोर्टल हे दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणारे देणगीदार, अशासकीय संघटना, सामाजिक संस्था, कंपन्या, समाजसेवक या सर्वांना विनामूल्य जोडणारा दुवा आहे. या सर्वांना एकाच व्यासपीठाखाली आणणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे. विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजून घेणे या बाबी या पोर्टलमुळे शक्य होणार आहेत, असेही श्री. कोरगंटीवार यांनी कळवले आहे.