मु. सा. काकडे महाविद्यालयात 'निर्भय कन्या अभियान' विद्यार्थीनींसाठी स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण आणि व्याख्याने.
सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी बुधवार दि. २३ फेब्रुवारी रोजी 'निर्भय कन्या योजना' अंतर्गत व्याख्यान आणि स्वसंरक्षण कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे व उपस्थित वक्ते '- समीक्षा संध्या मिलिंद (मनोविश्लेषण तज्ञ), ॲड.स्नेहा भापकर ( ॲडव्होकेट, बारामती), श्री. निखील नाटकर (कराटे प्रशिक्षक) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व उपक्रमाचे समन्वयक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी उपस्थित व त्यांचे स्वागत केले आणि मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थिनींना सुप्त गुणांची नव्याने ओळख व निर्भय बनवण्याची प्रक्रिया व त्यासाठी महाविद्यालय व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. विद्यार्थी व पालक नात्याची विश्वासनीय गुंफण गरजेची असून महिलांसाठी कायद्याबद्दल जाणीवजागृती निर्माण होऊन आज प्रत्येक विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगीमहाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जया कदम,डॉ. प्रविण ताटे,प्रा. मेघा जगताप,महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग डॉ. संजू जाधव डॉ. निलेश आढाव, प्रा. अच्युत शिंदे, प्रा. आदिनाथ लोंढे डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा. प्रियंका तांबे प्रा. नीलम देवकाते, प्रा. चेतना तावरे, प्रा. नीलिमा निगडे, प्रा. प्राजक्ता शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले तर आभार डॉ. रेश्मा पठाण यांनी मानले.
उद्घाटन समारंभानंतर ॲड. स्नेहा भापकर यांनी 'स्त्रियांचे कायदे आणि संरक्षण' या विषयावर मार्गदर्शन केले. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी भारतामध्ये जेवढे कायदे आहेत तेवढे इतरत्र कोणत्याही देशात नाही. स्त्रीविषयक कायद्या बद्दलचे अज्ञान दूर होणे गरजेचे असून त्यासाठी न्यायालय, पोलिस व प्रसारमाध्यमांची जबाबदारी महत्वाचे आहे. स्त्री ही आईच्या गर्भात असल्यापासून संरक्षण देण्याचे काम कायद्याने केलेले आहे. गुन्हा होण्याची वाट बघण्यापेक्षा त्यास प्रतिकार प्रतिबंध केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक वापर करून फेसबुक व्हाट्सअप व मोबाईलचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींनो तुम्ही निर्भय बना पण फक्त बोलण्यापुरते निर्भय होऊ नका, विचाराने निर्भय व्हा व कायद्याचा गैरवापर करू नका असा बहुमोल सल्ला त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला.
यानंतर समिक्षा संध्या मिलिंद यांनी 'नवीन आव्हानांना सामोरे जाताना' या विषयावर प्रकाश टाकत असताना आजच्या टेक्नोसॅवी पिढीला गटामधून मागे पडण्याची भीती वाटते, तसेच त्यांच्यामध्ये सहनशीलता कमी होऊन आक्रमक प्रतिक्रिया देण्याचा वाढता कल याचा मनोविश्लेषणात्मक दृष्ट्या होणारा परिणाम विद्यार्थिनीं समोर मांडला. ऑनलाइनच्या जमान्यामध्ये स्क्रीन टाइम कमी करून मानसिक स्थिरता निर्माण करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी छंद जोपासा, वेळेचे व्यवस्थापन करा, व्यायाम व योगावर भर द्या, डायरी लेखनाच्या माध्यमातून भावनांचा निचरा करा आणि आभासी नातेसंबंधांमध्ये अडकण्या आधी डोळसपणे पहा, विचार करा असा सल्ला समीक्षा यांनी दिला.
दुसऱ्या सत्रामध्ये निखील नाटकर यांनी 'स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण, या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार राहायला हवे, मनातील भीती काढून जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम व्हायला हवे, कोणत्याही छेडछाड इकडे डोळेझाक न करता विद्यार्थिनींनी निर्भयपणे त्याचा प्रतिकार करायला हवा असा सल्ला त्यांनी आपल्या प्रशिक्षणादरम्यान दिला. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी वेगवेगळ्या कराटेच्या ट्रिक्स शिकवल्या गेल्या. स्वसंरक्षण प्रशिक्षणातूनचआपण सर्वजणी निर्भय होऊ शकाल असे प्रतिपादन त्यांनी केले.
शेवटी उपस्थित विद्यार्थिनींसाठी प्रश्न व उत्तरांसाठी सत्र खुले करण्यात आले. यामध्ये विद्यार्थीनींनी आपले प्रश्न विचारले व वक्त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. उपस्थित विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील एकूण १४५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला
उपक्रमाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांचे मार्गदर्शन लाभले. ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.