Type Here to Get Search Results !

सी गटातून गटातून दोनवेळचे विजेते जपान अव्वल

सी गटातून  गटातून दोनवेळचे विजेते जपान अव्वल
पुणे २७ जानेवारी २०२२:  दोन वेळच्या माजी विजेत्या जपानने आज सी गटातून  एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत अव्वल स्थान निश्चित केले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत आज जपान वि. कोरिया यांच्या दरम्यान झालेला सामना १-१ गोल बरोबरीत सुटला.

सेओ जी योऑन हिने सामना संपण्यास पाचच मिनिटे बाकी असताना केलेल्या गोलमुळे कोलिन बेल्स यांच्या संघाला एक गुण मिळविता आला. संपूर्ण वर्चस्व राखलेल्या जपानला रिको उएकी हिने पहिल्याच मिनिटाला गोल करून जपानला आघाडीवर नेले होते. फुतोशी इकेडा यांच्या जपान संघाला इतकी चांगली सुरवात मिळाली नसती. चेंडूचा ताबा मिळाल्यापासून ती अशा काही वेगाने धावली की कोरियन बचावफळीला तिच्याकडे बघण्याशिवाय काहीच उरले नाही. शिओरी मियाकेल हिच्याकडून तिला पास मिळाला होता. त्यानंतर ती एकटी सुसाट गेली आणि कोरियन गोलरक्षक किम जुंग मी हिलाही तिने चकवत चेंडूला अचूक जाळीची दिशा दिली. विजेत्या संघाच्या लौकिकाला साजेशी अशीच जपानची सुरवात होती. मध्यंतरापर्यंत त्यांनी खरे तर आणखी मोठी आघाडी घ्यायला हवी होती.

युई हसेगावा हिला सामन्याच्या १४व्या मिनिटाला चालून आलेली गोल करण्याची संधी साधता आली नाही. तिची किक कोरियन गोलरक्षक किम जुंग मी हिला चकवणारी नव्हती. तेवढी ताकद त्या किकमध्ये नव्हती. त्यानंतर २७व्या मिनिटाला किमने आपल्या चपळतेचा सुरेख वापर करून युई हिचा आणखी प्रयत्न फोल ठरवला.

जपानच्या आक्रमणाची सारी जबाबदारी जणू आज हसेगवा हिच्याकडेच अधिक राहिली. तिच्या चालींचा जणू कोरियन बचावफळीने धसकाच घेतला होता, असेच चित्र मैदानावर होते. कधी डाव्या, तर कधी उजव्या बगलेतून चाली रचत तिने कोरियन बचावफळीची परिक्षा पाहिली. पहिल्याच मिनिटाला गोल केल्यानंतर जपानने आघाडी वाढवण्याचे अनेकदा प्रयत्न केले. पण, जपानच्या आक्रमकांना त्यात यश आले नाही. सामन्याच्या पूर्वार्धात निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या  जपानला दुसऱ्या सत्रात फार काही करता आले नाही. पण, याचा फायदा त्यांना उठवता आला नाही. कोरियाच्या चू ह्यो जू हिला अगदी जवळून गोल करण्याची संधी साधता आली नाही. जपानची गोलरक्षक आयाका यामाशिटा आणि चो सो ह्यून यांच्या डोक्यावरून चेंडू बाहेर गेला. त्यानंतर मोएका मिनामी हिला जपानचा दुसरा गोल करण्याची संधी होती. पण, तिची किक गोलपोस्टच्या वरून बाहेर गेली. कोरियन बचावफळीला कॉर्नर किक शिताफीने क्लिअर करता आली नव्हती. पण, त्यानंतरही मोएका अपयशी ठरल्यामुळे इकेडा यांच्या संघाला आघाडी न वाढल्याची खंत नक्की वाटली असेल.

सामन्याला पाच मिनिटे बाकी असताना कोरियासाठी सेओ सुपर सब ठरली. जपानच्या बचावफळीला चेंडू अडवण्यात अपयश आल्यावर सेओ हिने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल करून कोरियाला बरोबरी साधून दिली. केरियाच्या जी सो युन हिची कॉर्नर किक जपानच्या बचाव फळीला अडवता आली नाही आणि सेओने ही संधी साधून चेंडूला जाळीची अचूक दिशा दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test