वाचन संस्कृतीचा विकास काळाची गरज - सुनिताराजे पवार
सोमेश्वरनगर - बारामतीतील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, बारामती व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभाग आयोजित 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दूरदृश्यप्रणाली पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मा.सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथील मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थित होत्या. 'भाषा , साहित्य आणि समाज ' या विषयावर त्यांनी सविस्तर मांडणी केली. या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण, वैचारिक उंची गाठणारे आणि सहज-सुंदर, सोप्या शैलीत आणि सर्वसामान्यांच्या बोलीत मराठीच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा त्यांनी वेध घेतला. मराठी भाषा आणि मराठी साहित्य यांचा पूर्व इतिहास सांगत मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध अशा गौरवशाली परंपरेवर त्यांनी प्रकाश टाकला. समृद्ध जीवनानुभव असणारा साहित्यिक, साहित्यिकाने निर्माण केलेली साहित्यकृती आणि त्या साहित्यकृतीचा समाज जीवनावर होणारा परिणाम यांचा काय अनुबंध आहे हे त्यांनी अनेक उदाहरणांच्या आधारे समजावून सांगितले. माणसाच्या आयुष्यामध्ये मातृभाषेचे व साहित्याचे काय महत्त्व आहे? हे त्यांनी नेमकेपणाने उलगडून दाखवले. वाचन संस्कृतीचा विकास ही काळाची गरज असून वाचनानेच माणूस समृद्ध व प्रगल्भ होऊ शकतो. वाचनच माणसाला दिशा देतात तेव्हा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वेळ ग्रंथालयात व्यथीत करावा असेही त्यांनी सुचविले. आपली मराठी भाषा अतिशय सुंदर आहे, ती कधीही नष्ट होणार नाही. तिला हजारो वर्षांची परंपरा आहे. तिचा आपण आवर्जून वापर करु व तिला सर्वश्रेष्ठ ठरवू!' असा आशावाद व्यक्त केला. महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सचिव मा. जयवंतराव घोरपडे यांनी कार्यक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मराठी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. देविदास वायदंडे होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी साहित्यिक योगदानाचे कौतुक केले. मराठी साहित्य सर्वार्थाने समृद्ध झाले आहे. मराठीचा दबदबा मोठा असून ती प्रत्येकाच्या मनाशी जवळीक साधते. मराठी भाषेला हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. जगातील ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. त्यामुळे तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आणि मराठी विभागप्रमुख डॉ.जया कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक करताना त्यांनी म्हटले की, "एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भाषा संपली की संस्कृती संपणार; संस्कृती संपली की माणूस संपणार आहे; आणि माणूस संपला म्हणजे समाज संपणार आहे. आपला माणूस, आपला समाज, आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला भाषा ही टिकवावीच लागणार आहे. हे वास्तव आपण स्वीकारावे, अंमलात आणावे. प्रत्येक दिवस हा मराठी भाषेचाच मानला गेला पाहिजे. शासनाबरोबर मराठी भाषा टिकवणे आणि ती अधिकाधिक समृद्ध करणे ही आपलीही जबाबदारी आहे." महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे- देशमुख यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अंतर्गत गुणवत्ता सुधार हमीचे समन्वयक आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.संजू जाधव यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले. तंत्रसहाय्य्क म्हणून प्रा.रजनीकांत गायकवाड महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, प्रा. जवाहर चौधरी, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ निलेश आढाव, डॉ. नारायण राजुरवार, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. दत्तात्रेय डुबल, प्रा. आदिनाथ लोंढे, प्रा. पोपट जाधव, प्रियंका जाधव, प्रा.नीलम देवकाते आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.