Type Here to Get Search Results !

महिला अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या "निर्भया" पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महिला अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या "निर्भया" पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईतील महिलांना आता "निर्भया" पथकाचे सुरक्षा कवच ;103 क्रमांक डायल करून निर्भया पथकाची मदत घेता येणार
निर्भया पथकातील नवीन वाहनांचे मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

 

मुंबई, दि. 26 :   महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्देवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी  यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून  महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल टाकल्याचे व यामुळे  महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी  प्राप्त होणार असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज निर्भया पथकाचे तर मान्यवरांच्या उपस्थितीत इतर विविध निर्भया उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, (दूरदृष्यप्रणालीद्वारे) गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील (दूरदृष्यप्रणालीद्वारे), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह पोलीस दलातील  इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आज निर्भया पथक आणि महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे विविध उपक्रम सुरु करून मुंबई पोलीसांनी एक स्तुत्य काम केले आहे. त्याबद्दल गृहमंत्री आणि मुंबई पोलीस दलाचे विशेष कौतूक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करत आहेत, विविध क्षेत्रात त्यांची ही घोडदौड सुरु असतांना समाजातील सामान्यातल्या सामान्य महिलेला सुरक्षितता पुरवणे गरजेचे आहे. एखादी घटना घडते, त्या काळापुरता हल्लकल्लोळ माजतो परंतू नंतर काही काळाने सगळे थंड होते,  महिला सुरक्षितता हा विषय फक्त त्या दिवसापुरता चर्चेत राहतो. असे होता कामा नये.

निर्भया पथके कायद्याचा वचक निर्माण करतील

             आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ते मातृभक्त होते. आपण झाशीच्या राणीचे नाव घेतो,  आपल्या महाराष्ट्राला साधुसंतांची शिकवण आणि संस्कार आहे. परंतू जिथे महिलांवर दुर्देवाने अत्याचार घडतात तिथे कायद्याचा वचक निर्माण करणारी ही निर्भया पथके महत्वाची ठरणार आहेत. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेला 11 लाखाचा निधी हा महिला सुरक्षिततेच्या कामासाठीच वापरला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पोलीसदलाचे काम कठीण आणि आव्हानात्मक आहे. अशाही परिस्थितीत ते उत्तमप्रकारे काम करत आहेत,  मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा करणे, राज्याची सुरक्षा राखणे हे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे. त्यात सरकार म्हणून आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्यात येईल, आपला प्रत्यक्ष पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती मोडून काढल्या पाहिजेत, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी पुरस्काराने गौरवांकित झालेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची मातृभक्त महाराष्ट्र, शक्तीपुजक महाराष्ट्र आणि महिलांचा रक्षणकर्ता महाराष्ट्र अशी ओळख देशालाच नाही तर जगाला होईल अशा पद्धतीने आपण सर्वजण  मिळून काम करूया, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

            समाजाची प्रतिष्ठा ही महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असून जिथे महिला सुरक्षित नाहीत तिथे कधीही प्रगती होत नसल्याचे स्पष्ट करून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज निर्भया पथकासह सुरु केलेल्या विविध निर्भया उपक्रमाचे कौतूक केले. यातून महिला सुरक्षिततेचे बळकट पाऊल पुढे पडल्याचे ते म्हणाले.  त्यांनी शौर्य/सेवा/ राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन  करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पोलीसांच्या एकनिष्ठ सेवेचा अभिमान असल्याचे सांगून त्यांनी भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, ही अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाला एक गौरवशाली परंपरा असल्याचे सांगतांना गृहमंत्र्यांनी निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेचा उल्लेख केला. इथे पोलीसांचा प्रतिसाद कालावधी फक्त 10 मिनीटांचा होता आणि अवघ्या 18 दिवसात दोषारोपपत्र दाखल केल्याचे ते म्हणाले.  याचपद्धतीने मुंबई पोलीसदलाचे तपास काम सुरु राहिल्यास गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसेल, असेही ते म्हणाले. 

पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन येणाऱ्या महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यास गुन्हेगारांचे धैर्य वाढणार नाही, मोठ्या घटना घडणार नाहीत, पोलीसांवरील ताण कमी होईल याकडेही गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भयमुक्त राहील यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य- हेमंत नगराळे

            अर्भक ते वार्धक्य या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरीत तपास करणे, कोर्टातील प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले. महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथके काम करणार असून  मुंबईतील ९१ पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. जाणीव जागृतीसाठी आज निर्भया फेसबूक, निर्भया पुस्तिका प्रकाशित करण्यातआली आहे. निर्भया संकल्पगीत, निर्भया लोगोचे अनावरण अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेप्रती लोकमनात जागृती करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. १०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी  माहिती त्यांनी दिली.

विविध उद्घाटन कार्यक्रमाची क्षणचित्रे

·       निर्भया संकल्पगीताचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. हिंदी चित्रगीत चित्रपट दिग्दर्शक  रोहित शेट्टी यांनी तयार केले असून त्यास अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला आहे तर मराठी चित्रगीत राहूल रायकर आणि त्यांच्या टीमने तयार केले आहे.

·       रोहित शेट्टी यांनी 50 लाख रुपयांचा निधी निर्भया पथकासाठी दिला.

·       प्रख्यात सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार

·       मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पाच प्रादेशिक समुपदेशन केंद्राचे उदघाटन

·       एम पॉवर संस्थेच्या नीरजा बिर्ला यांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

·       निर्भया चित्रगीत (मराठी) तयार करणाऱ्या राहूल रायकर आणि सहकाऱ्यांचे मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते गौरव

·       गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्याकडे 11 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला

·       निर्भया मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशन पालकमंत्री अस्लम शेख आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले

·       खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबई पोलीस दलाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

·       विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते निर्भया बोधचिन्हाचे प्रकाशन

·       महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते निर्भया फेसबूक पेजचे उद्घाटन

·       महिला कक्षाचे उदघाटन खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते

·       दिनदर्शिका ज्यांच्या छायाचित्राने सजली आहे त्या छायाचित्रकार प्रवीण टलानी आणि समाज माध्यम तज्ज्ञ संचिका पांडे यांचा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार

·       उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात निर्भया पथकाच्या  वाहनांना ध्वजांकित (फ्लॅग ऑफ) केले.

·       राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या बृहन्मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार.

·       उत्कृष्ट कामाबद्दल निर्भया पथकातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

·       रिलायन्स फाऊंडेशनमार्फत 3 वर्षाच्या इंटरनेट सुविधेसह 100 आयफोन देण्यात येणार आहेत. पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी निर्भया पथकातील 5  प्रादेशिक अधिकाऱ्यांना हे आयफोन प्राधिनिधिक स्वरूपात वितरीत केले.

·       रिलायन्स फाऊंडेशनचे श्रीमती सिराज कोतवाल यांचा पालकमंत्री श्री. ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

·       यावेळी निर्भया पथकातील नवीन वाहनांचे मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test