दणदणीत विजयासह फिलिपाईन्स बाद फेरीत
पुणे : एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेत फिलिपाईन्सने ब गटातील लढतीत आज इंडोनेशियावर ६-० गोलने दणदणीत विजय मिळवून थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर आज झालेल्या लढतीत फिलिपाईन्स संघाने सहा गुणांची कमाई केली. ते ऑस्ट्रेलियापेक्षा तीन गुणांनी पिछाडीवर राहिले. ब गटात ते दुसऱ्या स्थानावर राहिले आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांची गाठ चायनीज तैवानशी पडणार आहे.
सलग दुसऱ्या स्पर्धेत बाद फेरी गाठण्याच्या इराद्याने खेळणाऱ्या फिलिपाईन्सने सुरवातीपासून प्रतिस्पर्धी इंडोनेशियावर कसे दडपण राहिल हेच उद्दिष्ट ठेवून खेळ केला. व्हिव्ही ओक्टाविआ रिस्की हिच्याकडून गोलकक्षात चेंडू हाताळला गेल्यामुळे रेफ्रीने फिलिपाईन्सला पेनल्टी किक बहाल केली. पण, कॅटरिने गुईल्लोऊ हिला किक साधता आली नाही. तिची किक गोलपोस्टच्या वरून बाहेर गेली. पण, तिने सहाव्या मिनिटाला आपली चूक सुधारलवी. डाव्या बगलेतून पुढे येणाºया कार्लेग फ्रिल्लेस हिच्या क्रॉसपास वर गुईल्लोऊ हिने चेंडूला अचूक दिशा दिली. इंडोनेशियाची गोलरक्षक रिस्का अप्रिलिया हिला चेंडू अडवणे जमले नाही .
एका गोलच्या पिछाडीनंतर इंडोनेशियाने प्रतिआक्रमण करण्याचा जरूर प्रयत्न केला. पण, फिलिपाईन्सच्या बचावफळीने त्यांना वर्चस्वापासून रोखले. फिलिपाईन्सने २७व्या मिनिटाला दुसरा गोल केला. सरिना बोल्डेन हिने हेडरद्वारे सुरेख गोल केला. सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखताना फिलिपाईन्सने एकामागून एक आक्रमणांची मालिका चालूच ठेवली. मात्र, अप्रिलिया हिने त्यांची प्रत्येक आक्रमणे थोपवून धरली. अप्रिलिया जेवढी सावध होती, तेवढी इंडोनेशियाची बचावफळी सतर्क नव्हती. ते फिलिपाईन्सच्या आक्रमकांना रोखू शकल्या नाहित. सामन्याच्या ५६व्या मिनिटाला बचाव फळीतील चुकीने तान्हाई अन्निस हिने एक सोपा गोल केला. दडपणाखाली इंडोनेशियाकडून चुका होतच राहिल्या. सामन्याच्या ७३व्या मिनिटाला त्यांनी अशाच आणखी एका चुकीमुळे त्यांना पेनल्टी बसली आणि जेस्सिका मिक्लाट हिने गोल नोंदवून फिलिपाईन्सची आघाडी ४-० गोल अशी भक्कम केली.
त्यानंतर अखेरच्या काही मिनिटांत त्यांना कमालीचा वेगवान खेळ करत आणखी दोन गोल नोंदवले. सामन्याच्या ८३ व्या मिनिटाला अन्निस हिने आपला दुसरा गोल करताना संघाचा पाचवा गोल केला. तिच्या २० यार्डावरून बसलेल्या किकने जाळीचा अचूक वेध घेतला. त्यानंतर भरपाई वेळेतील चौथ्या मिनिटाला मालेआ ल्युसी सीझप हिने सहावा गोल करून फिलिपाईन्सचे वर्चस्व सिद्ध केले.