लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल
सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारा - राज्य लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे
पुणे, दि.10 :- राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे. हा अहवाल सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी अशा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. नागरिकांनी सुलभ संदर्भासाठी हा वार्षिक अहवाल आणि प्रश्नांबाबतच्या मार्गदर्शिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन पुणे विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले आहे.
आयोगाचा वार्षिक अहवाल मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असून त्यासोबतच नागरिकांकडून आयोगाकडे सातत्याने विचारणा करण्यात येणारे प्रश्नही मराठी व इंग्रजी भाषेत पोर्टलवर उपलब्ध आहेत. या अहवालाव्यतिरिक्त लोकसेवा हक्काबाबत नागरिकांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्नही ‘आपले सरकार’ या पोर्टलवर स्वतंत्ररित्या उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून नागरिकांद्वारे वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी मार्गदर्शिका उपलब्ध झाली आहे.
नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा प्राप्त करण्याचा अधिकार असून या आयोगाच्या माध्यमातून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते. ‘आपली सेवा’ ‘आमचे कर्तव्य’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या आयोगाद्वारे प्रशासकीय कार्यपद्धती विषयीच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे लोकसेवा देणा-या यंत्रणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. आपले सरकार पोर्टलवरील जलद सेवा, सेवा आपल्या दारात, सहज पोहोच, सोपी शुल्कभरणा, वापरण्यास सोपे आणि वेळेची बचत आदी विंडोंच्या माध्यमातून लोकसेवा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांना मदत करण्यात येते. राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा प्रसिध्द झालेला 2020-21 या वर्षाचा अहवाल सर्व नागरिकांना ‘आपले सरकार’ या पोर्टलवरुन विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. तो 176 पानांचा असून, आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या पुढाकाराने तो तत्परतेने प्रकाशित झाला आहे. त्यात लोकसेवा हक्क कायदा, त्याच्या अंमलबजावणीची राज्यातील सद्यस्थिती आदींसह विविध अनुषंगिक बाबींबाबत सर्वंकष माहिती समाविष्ट आहे. नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून हा अहवाल सहज उपलब्ध झाला असून इच्छुकांना तो सहजरित्या डाऊनलोड करता येणार आहे.