Type Here to Get Search Results !

काळानुसार बालभारती बदलत आहे - प्रा. वर्षा गायकवाड

काळानुसार बालभारती बदलत आहे - प्रा. वर्षा गायकवाड
पुणे, दि.  २७ : बालभारतीचे आजवरचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा बालभारतीच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले. बालभारतीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा,  भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी रंगनाथ नाईकडे, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. 
प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. नवी पिढी ही अधिक गतिमान आणि तंत्रस्नेही आहे. कोरोना काळाने या क्षेत्रापुढे देखील विविध आव्हान उभे केले आहेत. या अनुषंगाने मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी बालभारती प्रयत्नशील आहे. पुस्तकांच्या आशय आणि रचनेत मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून येणारी एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके हा त्याचाच एक भाग आहे. राज्यातील शिक्षण तज्ज्ञांच्या साहाय्याने येत्या काळात अभ्यासक्रम आणि पुस्तकाच्या क्षेत्रात विविध प्रयोग केले जाणार आहेत. ही पुस्तके शिक्षणातील नवनवीन प्रवाहांना सामावून घेणारी, जागतिकीकरणाचे आव्हाने पेलणारी तसेच मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी असतील. 
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते रंगनाथ नाईकडे म्हणाले की, शालेय शिक्षण विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्याची आणि पर्यायाने देशाची पायाभरणी शिक्षणाच्या माध्यमातून होत असते. आजवर अनेक पिढ्या घडविण्यात बालभारतीचा मोठा वाटा राहिला आहे. लहानपणी बालभारतीशी जुळलेले भावबंध मोठे झालो तरी कायम राहतात. बालभारतीचे काम हे एखाद्या दीपस्तंभासारखे राहिले आहे. मागील पंचावन्न वर्षांपासून दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी बालभारतीचा ऋणी आहे. 
 याप्रसंगी शुभेच्छा देताना शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले, देशविदेशातील शिक्षण तज्ज्ञांशी बालभारती विषयी बोलताना कायम अभिमान वाटतो. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मातृभाषेतून देण्यात बालभारतीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. 
 कोरोनाचे सर्व नियम पाळत साजरा झालेल्या या सोहळ्यास बालभारतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test