रक्तसंकलनातील उल्लेखनीय कामाबद्दल डॉ. शंकर मुगावे यांचा सन्मान
पुणे, दि. 28: कोविड संकटाच्या कालावधीत संकटात रक्तदान शिबिराचे, प्लाझा आणि रक्त संकलन यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचे योग्य नियोजन केल्यामुळे पुणे विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. रक्तदान कार्यासंबंधी योग्य नियोजनाबद्दल विभागीय मुख्य समन्वयक (रक्तपेढी) तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक डॉ. शंकर मुगावे यांचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून हा सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त माननीय डॉ. अनिल रामोड, उपायुक्त संतोष पाटील साहेब आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोविड संकटात पुणे विभागाने रक्तदान शिबिराचे, प्लाझा आणि रक्त संकलन यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचे योग्य नियोजन करून रक्ताच्या टंचाईवर मात केली आहे. यामध्ये डॉ. मुगावे आणि त्यांच्या चमूचे मोठे योगदान आहे.
कोविड कालावधी असतानाही या कालावधीमध्ये रक्तसंकलनात बाधा येणार नाही यासाठी पुणे विभागांतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांचे, रक्तदान शिबिर आयोजकांचे आणि ऐच्छिक रक्तदात्यांचे या कामात खूप सकारात्मक सहकार्य मिळाले, असे डॉ. मुगावे कार्यक्रमानंतर म्हणाले.