भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना
पुणे दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भिला चौधरी, पांडुरंग लक्ष्मण वांजळे, विजय उत्तम भोंग तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अशोक रामचंद्र मोरे, सहायक पोलीय आयुक्त बजरंग देसाई, पुणे महानगरपालिका उपायुक्त नितीन उधास यांचा सन्मान करण्यात आला.
पुणे जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जुन्नर प्रकल्पांतर्गत ओतूर ग्रामपंचायतीतील मोमिन गल्ली या अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका रेश्मा गनी मोमिन यांना उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक, पेठ प्रकल्पांतर्गत पेठ ग्रामपंचायतीतील माळीवस्ती अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका विजया लिलाधर थोरात यांना द्वितीय क्रमांक आणि पुरंदर प्रकल्पांतर्गत चांबळी ग्रामपंचायतीच्या चांबळी क्र. 3 अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका अनिता गोकुळ भिसे यांना तृतीय क्रमांक मिळाल्याने त्यांचाही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
*जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालय मोबाईल वाहनांचे लोकार्पण*
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पशुचिकित्सालयाच्या १० मोबाईल वाहनांचेही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यांनी लोकार्पण केले. फिरते पशुचिकित्सालय सुरू करणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे, अशी माहिती यावेळी आयुष कुमार प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर यांनी दिली.
ही सर्व वाहने जीपीएस प्रणालीवर दिसतील याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी श्री.पवार यांनी दिल्या. त्यांनी वाहनातील विविध सुविधांविषयी माहिती घेतली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पशुंना वेळेत आणि परवडणाऱ्या दरात उपचार योग्य पद्धतीने मिळावेत, असेही त्यांनी सांगितले.
‘१९६२’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास या मोबाईल वाहनांद्वारे ठरलेल्या गावातील शेतकऱ्यांना सेवा मिळणार आहे. तज्ञ शासकीय पशुवैद्यक या वाहनात असणार असून अन्य उपचारांसोबतच अवघड शस्त्रक्रियाही या फिरत्या वाहनात होणार आहे. ५० रुपये इतके माफक शुल्क असणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा पारगे, समाजकल्याण समिती सभापती सारिका पानसरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.