दारू नको दूध प्या....!
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला वर्षअखेर व नवीन वर्षाचे स्वागत दारू नको तर दूध पिऊन करा असे आवाहन कोऱ्हाळे बुद्रुक येथील व्यसनमुक्ती युवक संघाचे कार्यकर्ते अनिल खोमणे यांनी केले आहे.
गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यकर्ते अनिल खोमणे ३१ डिसेंबर दिवशी स्वखर्चाने दूध वाटप करत असतात. सरत्या वर्षाला निरोप देताना व नव्या वर्षाचे स्वागत करताना अनेक तरुण मद्य प्राशन करतात. त्यामुळे बऱ्याचदा अपघात होतात. त्यामुळे आजचा दिवस आपल्या कुटुंबीयांसोबत घालवा, दारू नको तर दूध पित नव्या वर्षाचे स्वागत करा असे आवाहन अनिल खोमणे करत असतात. यावर्षी ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर खोमणे यांनी सुमारे पन्नास लिटर गरम सुगंधी दुधाचे वाटप केले. यावेळी सरपंच रवींद्र खोमणे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसीम शेख, राजेंद्र माळशिकारे, सोमनाथ गावडे, संतराम साहू व ग्रामस्थ उपस्थित होते. खोमणे यांच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.