तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण व नोंदणीबाबत तृतीयपंथीय संस्थांशी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांची चर्चा
तृतीयपंथीयांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, तृतीयपंथीयांसाठी पुण्यात आधारश्रम सुरु करणे तसेच तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण व नोंदणीबाबत तृतीयपंथीय संस्थांशी सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी चर्चा केली.
सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या बैठकीला समाज कल्याण निरीक्षक नेत्राली येवले, तसेच पुणे जिल्ह्यातील बिंदु क्वीर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे तृतीय फाऊंडेशन व मंगलमुखी फाऊंडेशनचे प्रतिनिधी मयुरी बनसोड, भूमी फाऊंडेशनचे श्री. कैलास पवार, महालक्ष्मी सामाजिक संस्थेचे लखन ओव्हाळ, संजय टाकळकर तसेच समुपदेशक कृपाली बिडये उपस्थित होते.
श्रीमती संगिता डावखर म्हणाल्या, शासनाच्या निर्देशानुसार पुणे येथे तृतीयपंथीयांसाठी आधारश्रम सुरु करणे व तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी तसेच प्रशिक्षणाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. पुणे जिल्हयातील तृतीयपंथीय संस्थांशी जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी त्वरीत संपर्क साधून माहितीची नोंदणी करणेबाबत तसेच ट्रान्सजेंडर पोर्टलवर ओळखपत्र व ओळखप्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्यात यावे, तसेच आधारकार्ड व संजय गांधी निराधार योजनांचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.