मु. सा .काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे मुलींच्या कुस्ती स्पर्धा संपन्न.
सोमेश्वरनगर- बारामतीतील मु. सा. काकडे महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अंतरविभागीय कुस्ती (मुली) स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन तेजस्विनी अभिजित काकडे-देशमुख यांच्या शुभाहस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती पंचायत समितीच्या सभापती . निता फरांदे होत्या. यावेळी बारामती पंचायत समिती सदस्या मेनका मगर, वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदा सकुंडे, सुचिता साळवे उपस्थित होत्या. या स्पर्धेत ७१ मुलींनी सहभाग घेतला.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय पंच प्रा. दिनेश गुंड यांनी पंच म्हणून काम पाहिले.
यावेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.जवाहर चौधरी, नवनियुक्त प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे, सहसचिव सतिशराव लकडे, सर्व विभागांचे उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सभापती फरांदे यांनी महाविद्यालयास अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाने केलेले कुस्ती स्पर्धेचे आयोजन हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पुणे जिल्हा, पुणे शहर, अहमदनगर व नाशिक येथून कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी कुस्तीच्या इतिहासावर संक्षिप्त प्रकाशझोत टाकत आलेल्या विद्यार्थ्यांनी यशापयशाची चिंता न करता खिलाडूवृत्तीने स्पर्धेत सहभागी व्हावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा. दत्तराज जगताप यांनी मानले.