युवासप्ताह व युवा महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन
पुणे दि.२२:आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे युवादिन, युवासप्ताह व युवा महोत्सव निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुका, जिल्हास्तरावर ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ आयोजित करण्यात येणार असून त्याकरिता दोन किलोमीटर किमान अंतर असणार आहे. सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून आरोग्य जागृती, तंदुरुस्ती, खेळा व निरोगी रहा, महिला जनजागृती याबाबत संदेश देण्यात येणार आहेत.
युवक कल्याण विषयक विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. युवांमध्ये व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व गुण, श्रमदान, वृक्षलागवड, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा क्रीडा विषयक आव्हानात्मक विषयांवर चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने, परिसंवाद, एकात्मता व पर्यावरण विषयक बाबींवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सहकार्याने वरील कार्यक्रमाचे आयोजन करून ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ल्यांची स्वच्छता आदी उपक्रमाद्वारे कार्यक्रमाची व्यापकता वाढविण्यात येणार आहे.
महिला स्वसंरक्षण प्रात्यक्षिके उपक्रमाअंतर्गत महिलांमध्ये स्वसंरक्षण विषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय स्तरावर स्वसंरक्षण प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.
‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत शालेय क्रीडा सप्ताहात फ्री हँड एक्सरसाईज व फन अॅन्ड फिटनेस, फॅमिली फिटनेस, प्रश्नमंजुषा, कॉमन योगा, प्रोटोकॉल, व्याख्यान, डाएट व न्युट्रिशन, बुद्धीमत्ता खेळ तसेच स्पर्धात्मक खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
युवा दिन युवा सप्ताह १२ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. १५ ते २० वर्ष मुले व मुली व २० वर्षावरील ते २९ वर्षांखालील युवक अशा दोन गटात जिल्हास्तरावर निबंधस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शालेय, महाविद्यालयीन पातळीवर वक्तृत्व, चित्रकला स्पर्धाचे अयोजन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून विविध खेळ स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावरील युवा पुरस्कारार्थीचे युवांकरिता जिल्हास्तरावरील कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून पुरस्कारार्थीचे परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्तींसोबत संवाद साधण्यासाठी चर्चासत्र तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवांसाठी नोकरी, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय रोजगार व स्वयंरोजगारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शासनाने वेळोवळी निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वांनी सामाजिक अंतराचे भान राखून आणि आवश्यक त्या उपाययोजना आणि काळजी घेऊन युवा सप्ताह साजरा करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.