लाल परीला लागला ब्रेक ; खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनीकेला दुप्पट दर
बारामती - राज्य परिवहन महामंडळाचा राज्य
शासनामध्ये सहभाग करून घ्यावा, यासह
विविध मागण्यासाठी राज्यभरातील एसटी
कर्मचा-यांनी संप पुकारला आहे. दरम्यान बारामती आगाराच्या कर्मचा-यांनीही सोमवारपासून (दि.८) रोजी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत विलिणीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा कर्मचा-यांनी दिला
आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे ट्रॅव्हल्स चालकांकडून प्रवाशांना तिकिट दर दुप्पट आकारून लुबाडले जात आहे. एस टी कामगारांच्या संपाचे लोण बारामतीत ही पसरले असून त्याला पाठिंबा देत सोमवारी सकाळपासून बारामती सह जिल्यातील सर्व आगारांमध्ये संप सुरु झाला आहे.त्यामुळे रात्री निवासी आलेल्या गाड्या वगळता (दि:८) रोजी लाल परीची चाके पूर्णपणे थांबली. बारामतीतील एसटी कर्मचा-यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने काल सकाळपासून एकही एसटी रस्त्यावर नसल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.
सर्वाधिक एसटीची वाहतूक बारामतीहून पुण्याला असते. काल सकाळपासूनच एसटीची वाहतूक थंडावली असल्याने बारामतीच्या बसस्थानकावर येणा-या प्रत्येक प्रवाशाला एक तर प्रवासाचा बेत रद्द करावा लागत आहे किंवा खाजगी पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी सुरु असलेल्या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यानंतर आजपासून कर्मचारी कामापासून दूर राहिले. बारामती व एमआयडीसी अशा दोन्ही आगारांच्या मिळून १२० बसेस आहेत. २५० चालक व जवळपास २२० वाहक या आगारात कार्यरत असून जवळपास बारा हजार प्रवाशांची दररोज या माध्यमातून राज्याच्या कानाकोप-यात वाहतूक होते. सामान्यांच्या प्रवासाचे साधन म्हणून ओळखणा-या लालपरीचे चाक थंडावल्याने काल अनेकांचे हाल झाले.
काही खाजगी वाहनचालकांनी जास्तीचे दर आकारुन पुण्याला गाड्या नेल्या पण त्यांची संख्या मर्यादीत असल्याने प्रवाशांची सोय झालीच नाही, अनेकांनी प्रवासाचा बेत रद्द केला तर ज्यांना जाणे अनिवार्य होते त्यांनी खाजगी वाहनांचा आधार घेतला. रेल्वे सेवा बंद असल्याने एसटीवरच प्रवाशांचे प्रवासाचे बेत अवलंबून होते, मात्र एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
कर्मचा-यांचीही भूमिका समजून घ्यावी
दरम्यान प्रवाशांना वेठीस धरण्यासाठी नाही तर आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संप असल्याची प्रतिक्रीया कर्मचा-यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच या मागची भावना आहे, त्या मुळे संपासारखा मार्ग अवलंबला असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवाशांनीही एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा विचार करुन सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
"एसटी महामंडळ बंद असल्यामुळे खाजगी वाहनांनी लगेचच दर रेट वाढवला. बारामती ते स्वारगेट ला जाण्यासाठी खाजगी वाहनांनी ४०० रुपये असा दर केला त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली आहे. ऐन सणासुदीत एसटी कामगार संपावर गेल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनचालकांना जास्तीचे भाडे द्यावे लागत आहे "
प्रवाशी प्रतिक्रीया..