धनत्रयोदशी अर्थात धन्वन्तरी जयंती हा दिवस "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस" म्हणून साजरा
AYURVEDA FOR POSHAN
संपूर्ण जगात योग दिवस लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र शासनाने सन 2016 पासून राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी येणाऱ्या दीपावली सणाच्या कालावधीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वन्तरी जयंती हा दिवस "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस" म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
भगवान धन्वन्तरी हे आरोग्य शास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. आरोग्यसंवर्धन होण्यासाठी म्हणून धन्वन्तरी जयंती केली जाते.
आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार या वर्षी हा दिवस दि. २ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशात "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस" म्हणून साजरा केला जाणार असून या दिनाचे घोषवाक्य " AYURVEDA FOR POSHAN " अर्थात "पोषणासाठी आयुर्वेद" हे आहे.
आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेद ही उपचार पध्दती नसून जीवनपध्दती आहे. आरोग्य संपन्न दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहार-विहार आणि आचार ईत्यादिचे वर्णन या शास्त्रात केले आहे. विश्वस्वास्थ्य आणि विश्वकल्याण या हेतून प्राचीन ॠषीयुनानी,निःस्वार्थपणे या शास्त्राचे जतन व संवर्धन केले आहे. हा भारतीयांना अनमोल ठेवा आहे.
सध्या कोविड महामारीमुळे संपूर्ण जग पस्त आहे. या व्याधीचे कारण मुलत: असलेले व्याधी विरोधी बल म्हणजेच व्याधीक्षमत्व कमी असणे हे सिध्द झाले आहे. हे बल (व्याधी क्षमत्व) टिकून रहाणे व कमी झाल्यास वाढवून आरोग्य निर्मिती करणे यासाठी औषधाएवढाच किंबहुना काही अधिक महत्व आहाराला आहे.
आहारसंभवं वस्तु रोगश्चाहार संभवः अर्थात आपले शरीर हे आपण घेतलेल्या आहारापासून बनते. तसेच व्याधी ही याच (अयोग्य) आहरापासून उत्पन्न होतात. या साठीच योग्य प्रकारे अन्न ग्रहण करणे व आहाराचे आयुर्वेद शास्त्रात वार्णित सर्व नियम पाळणे हे निरोगी राहण्याकरीता महत्वाचे ठरते. आयुर्वेदानुसार मनुष्याचे बल, प्रभा, सुख, आयुष्य हे योग्य प्रकारे घेतलेल्या आहारावर अवलंबून असते हा आहार कसा घ्यावा यासाठी "अष्टौ" आहार विधी विशेषायतनांचे आठ महत्त्वाच्या बाबी) वर्णन आयुर्वेदात केले आहे. ते पुढील प्रमाणे
(१) अन्न कायम गरम असावे.
(२) अन्न पदार्थांमध्ये स्निग्धतेचा अंतर्भाव असावा. उदा तूप, लोणी
(३) अन्न हे व्यक्तीसापेक्ष योग्य मात्रेत असावे.
४) आधीच्या घेतलेला आहार पचल्यानंतर पुन्हा जेवावे.
५) अयोग्य ठिकाणी, अस्वच्छता असलेल्या ठिकाणी जेवण करु नये
६) योग्य काळात जेवण पूर्ण करावे. खूप पाईने किंवा खूप हळूहळू जेवू नये.
७) बोलणे, हसणे, टी. व्ही. पहाणे हे जेवताना करू नये. एका चिलाने जेवण करावे,
८) परस्पर विरोधी अन्न पदार्थ एकत्र सेवन करू नयेत. जसे दूध फळे, अम्ल पदार्थ
आयुर्वेदाने आहाराला प्राण महटले आहे. तसेच आपल्या मानसभावांवरही अन्नाचा परिणाम होतो असे वर्णन आयुर्वेदीय ग्रंथात केले आहे. जसे सात्विक आहाराने सात्विक भाव व्यक्त होते. राजस (तिखट, मसालेदार इ.) आहाराने राजसभाव (चिडचिड, राग येणे, द्वेष इ.) व्यक्त होतात.
आहारात चवीचा विचार ( रस विचार) -
आहार हा षड् रसयुक्त असावा. जेवण हे गोड पदार्थाने सुरु करावे. त्यानंतर आंबट, तिखट, खारट, कडू व तुरट चवीचे पदार्थ घ्यावेत. याने मनुष्याने स्वास्थ्य टिकून रहाते. आपल्या रोजच्या जेवणात व आहारात असलेल्या वर्णनात विविध वर्गात विभागून वर्णन केले आहे.
आहार मात्रा विचार-
आपल्या पोटाचे ३ भाग केले असता १ भाग धन आहार, १ भाग द्रव आहार व १ भाग वायूच्या संचारासाठी रिकामा ठेवावा असे आयुर्वेदात सांगितले आहे.
आहार सात्म्य विचार-
ज्या व्यक्तीस ज्या पदार्थाची नित्य सेवनाने सवय झालेली असते तोच आहार कायम सुरु ठेवल्यास प्राय: त्रास होत नाही. यातील अपथ्यकार बाहार कमी करावयाचा असल्यास १/४ भाग क्रमशः कमी करत न्यावा.
जलपान विचार-
पिबेत् स्वस्थ पि अल्पशः अर्थात निरोगी व्यक्तीने देखील पाणी कमी प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. दिवस भर किती पाणी व केव्हा प्यावे याचा सामान्य नियम म्हणजे जेव्हा तहानेची जाणीव होईल तेव्हाच पाणी प्यावे अन्यथा पाणी पिऊ नये असा आहे. जेवताना मध्ये मध्ये घोट घोट पाणी प्यावे जेवणाआधी पाणी प्यायल्यास कृशता उत्पन्न होते. तसेच जेवणानंतर पाणी प्यायल्यास मेदसंचिती वाढते देह भार वाढतो.
थंड हवामानामध्ये सुंठ मुस्ता, जिरे यासारख्या द्रव्यांनी सिध्द असे कोमट पाणी घ्यावे. गरम/ उष्ण हवामानामध्य धने, जिरे, वाळा या द्रव्यांनी सिध्द पाणी घ्यावे.
आहारात काय खाऊ नये (अपथ्य)-
१) शिळे अन्न
२) थंड पदार्थ
३) अतितिखट, जतिखारट, जळजळीत पदार्थ
४) तळलेले पदार्थ
५) दही रात्री खाऊ नये. दही खाताना साखर, तूप, मध वा मुग गांबरोबर मिसळून खाये.
६) मोड आलेली कडधान्ये
७) विरुध्द पदार्थ जसे दूध+फळे/अम्ल पदार्थ
आहारात काय खावे -
१) भाकरी-ज्वारी/तांदूळ / नाचणी
२) भाज्या- दुधी भोपळा /पडवळ /दोडका/तांदुळचा इ.
३) राजगिरा लाहो/लाडू
४) मूगाचे सूप , कढण
५) मूग डाळ, खिचडी
६) फळे-डाळिंब, गोड मोसंबे काळी द्राक्षा (गोड)
वरील यादी ही सर्वसामान्य पथ्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त आहे. यातील व्याधी/प्रकृती विशिष्ट बदल/बारकावे हे आयुर्वेदा तज्ञांच्या मार्गदर्शनाने करावे
आधीचे जेवण पचले आहे हे कसे समजावे? -
१) जेव्हा मल, मुत्रादि विसर्जन झाल्यावर शरीराला हलकेपणा येणे (अंगलघव)
२) शुध्द उद्गार (ढेकर) येणे (विशुदध उदगार)
(३) उत्साह वाढणे
४) भूकेची जाणीव होणे,
५) तहानेची जाणीव होणे.
६) अन्न सेवानाची इच्छा होणे,
७) शरीराला व उदराला हलकेपणा येणे.
वरील लक्षणे निर्माण झाली की जेवण घ्यावे. अगोदरचे जेवण पचल्याशिवाय दूसरे जेवण घेवू नये, आयुर्वेदानुसार (भाव प्रकाश या ग्रंथात) जेवणानंतर ३ तासांपर्यंत पुन्हा काही खाऊ नये. तसेच ६ तासापेक्षा जास्त उपवास करू नये, असे म्हटले आहे.
तसेच दिवसभरात २ वेळा जेवावे, असे आयुर्वेदातीय ग्रंथ योगरत्नाकर यात सांगितले आहे. अशा प्रकारे योग्य काळी, सोय मात्रेत व योग्य पध्दतीचा आहार सेवन केल्याने आहाराचे पोषण होऊन आरोग्य टिकून रहाते व आयुष्य सुखकर होते.
आयुर्वेदामध्ये वर्णित जीवनाच्या तीन उपस्तंभापैकी एक आहार हा महत्वपूर्ण स्तंभ असल्याने प्रत्येकाने विचारपूर्वक योग्य आहाराचे सेवन करावे.
आहाराने देहाचे पोषणे योग्य होईल व व्याधी न होता निरोगी आयुष्य जगता होईल. यासाठी वरील वर्णित आहारातील आयुर्वेदीय संकल्पना सर्वांनी आपल्या रोजच्या जीवनात प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन निरोगी आयुष्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प आपण आज धनवंतरी दिनी करुया.
आपणास राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या धन्वंतरी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छ.
वैद्य व्यंकट पु.धर्माधिकारी,
एम.डी.(आयुर्वेद)
एम.ए (संस्कृत)
सहाय्यक संचालक आयुष, पुणे तथा विभागप्रमुख आयुर्वेद विभाग ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे