Type Here to Get Search Results !

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून
 पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. 

या कार्यक्रमांतर्गत सोमवार 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. शनिवार 13 नोव्हेंबर, रविवार 14 नोव्हेंबर, शनिवार 27 नोव्हेंबर आणि रविवार 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी मतदार नोंदणीसाठीचे अर्ज, दावे व हरकती स्वीकारणे आदींसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 

सोमवार 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून बुधवार 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान नवीन मतदार नोंदणी, दुबार नावे वगळणे, नावात, पत्ता, इतर तपशीलात दुरूस्ती, मतदार नोंदीचे स्थानांतरण आदी अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

नवीन मतदार नोंदणी किंवा एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात स्थानांतर झाले असल्यास मतदार नोंदणीसाठी नमुना 6, परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकास मतदार नोंदणीसाठी नमुना 6-अ, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्यास आक्षेप घेणे, स्वत:चे किंवा इतर व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी नमुना 7, तपशीलामध्ये करावयाच्या दुरूस्तीसाठी नमुना 8, मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी (एकाच मतदार संघात निवासाचे ठिकाण बदलले असल्यास) नमुना 8-अ भरुन देणे आवश्यक आहे. मोहिमेदरम्यान हे नमुने भरुन आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) द्यावेत. तसेच या सर्व सुविधा ऑनलाईनरित्या https://www.nvsp.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. 

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषरहीत करण्याच्यादृष्टीने हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी करावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test