Type Here to Get Search Results !

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वर्षा निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
 
मुंबई , जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.   
 
मुख्यमंत्री म्हणतात की, आजपासून श्री गणरायाचं आगमन होत असून, जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी करतो. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय.एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे.
गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल अशी मला खात्री आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते, आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूयात ही शपथ आजच्या या मंगल दिनी  घेऊयात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test