मु.सा.काकडे महाविद्यालयात 'प्राध्यापक प्रबोधिनी' मार्फत 'आर्थिक उदारीकरणाची तीन दशके आणि पुढील वाटचाल' या विषयावर व्याख्यान संपन्न .
बारामती तालुक्यातील मु.सा काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे प्राध्यापक प्रबोधिनी आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने *"भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाची तीन दशके आणि पुढील वाटचाल"* या विषयावर विशेष व्याख्यानाचे शनिवार दिनांक 18 सप्टेंबर २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे सर तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी होते.
"भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असताना पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी अत्यंत कठोर आणि प्रभावी निर्णय घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेला फक्त सावरलेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाचे स्थान प्राप्त करून दिले. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासात उदारीकरणाच्या धोरणाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे ठोस प्रतिपादन *श्यामलाल कॉलेज नवी दिल्ली येथील प्राध्यापक श्री विवेकानंद नरताम* यांनी केले ते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर 1980 च्या दशकात घडलेल्या घडामोडी आणि अमेरिका व रशिया यांच्यापासून भारताने स्वीकारलेले अलिप्ततावादी धोरण यामुळे औद्योगिकरण आणि त्यातून होणारा विकास या पासुन भारत आणि भारतीय अर्थव्यवस्था काहीसे मागे पडले होते. दुसऱ्या बाजूला भारत आणि भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी झालेली आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने व भारतीय राजकारणाची चुकलेली दिशा यामुळे भारताला उदारीकरणाचे आणि खाजगी करण्याचे धोरण स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिला नाही. आता देशात होणारे सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण हा या उदारीकरणाच्या धोरणाचा भाग असून भारताचे खऱ्या अर्थाने आता जागतिकीकरण झाले आहे. येत्या काळात उदारीकरणाचे सकारात्मक बदल भारतात दिसून येतील आणि भारत भविष्यातील एक सक्षम जागतिक अर्थसत्ता म्हणून उदयास येईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंत घोरपडे यांनी प्रा. प्रबोधिनीच्या या उपक्रमाचे कौतुक करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थकारणातील आणि राजकारणातील महत्त्व विशद केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे सहसचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे. डाॅ. जया कदम, डॉ. प्रवीण ताटे- देशमुख, प्रा.डाॅ.संजू जाधव. प्रा.डाॅ.डुबल. प्रा.ए. एस शिंदे आणि इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. प्रा. निलेश आढाव यांनी केले तर प्रा. डॉ. राहुल खरात यांनी आभार मानले.