पुणे शहरामध्ये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू
पुणे, पुणे शहरामध्ये 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कोरोना विषाणु प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनूसार गणेशोत्सव साजरा होणार आहे. या गणेशोत्सवासाठी पुणे शहरामध्ये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी लागू केले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणु (कोविड-19) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा- 1857 लागू आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, सर्व धर्माची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्यात तसेच संचारास मनाई करणारे आदेश लागू केलेले आहेत.
गणेशोत्सव काळात गणेश मंडळे त्यांच्या स्थापनेच्या ठिकाणी ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ उत्पन्न करतात किंवा हवेत सोडतात. ज्यामुळे मनुष्याचे जिवितास तसेच खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेस धोका उत्पन्न होण्याचा संभव असल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यात अथवा सार्वजनिक जागेत, कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर कोणत्याही ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. हा आदेश 10 सप्टेंबर 2021 रोजी 1 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2021 रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात असेल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेशीत केलेले आहे.