पुणे जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये अधिकार प्रदान
पुणे :- पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध भागात कोरोना विषाणुचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. त्याकरीता नागरीकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच अलीकडील काळात पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध मागण्याकरीता विविध पक्ष व संघटनाकडून दुध आंदोलने, इतर आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने इत्यादीचे आयोजन केले जात आहे. धनगर समाजाचे आरक्षणाबाबतचे आंदोलन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाचे आरक्षणास कायदा रद्द केल्याने व ओबीसी आरक्षण प्रयत्नासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत तसेच निवेदन देण्यात येत आहेत. बैलगाड्या शर्यती पुन्हा सुरु करणेकरीता शेतकरी आंदोलन करीत आहेत. दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी पासून दिनांक १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत गणपती उत्सव साजरा केला जाणार आहे. वरील कारणास्तव पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 12 सप्टेंबर 2021 रोजी 00.5 वाजता पासून 25 सप्टेंबर 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्याही मार्गाने कोणत्या वेळात काढव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे, व इतर वाद्ये वाजविणे व गाणी गाण्याचे ,शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, सक्षम प्राधिकाऱ्यानी या अधिनियमांची कलम 33,35,37, ते 40,42,43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे हे अधिकार प्रदान केले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.