महसूल दिनाचे औचित्य साधून प्रशासकीय भवन येथे रक्तदान शिबीर संपन्न
बारामती :- महसूल दिनाचे औचित्य साधून बारामती येथील प्रशासकीय भवन येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी एकूण 42 रक्त बाटल्या संकलित झाल्या.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार पी.डी. शिंदे, नायब तहसिलदार भक्ती सरवदे, ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्हास टुले, ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे, सर्व तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल व महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रातांधिकारी कांबळे यांनी प्रथमत: सर्वाना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महसूल विभागतील सर्व कर्मचाऱ्यांनी या कोरोना कालावधीमध्ये काम करत असतांना स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. सर्वांनी लोकाभिमुख काम करावे. महसूल दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करून एक समाज उपयोगी असा उपक्रम राबविल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबीराचे नियोजन निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर जाधव यांनी केले.