जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दिड वर्षांपासून निष्क्रीय पाडेगाव येथील शिक्षकास गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस.
कोरोना कालावधीत शैक्षणिक कामात कुचराई केल्याच्या कारणावरून पाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकास गटशिक्षणाधिकारी फलटण यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पाडेगाव ता फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले सुभाष गोवेकर यांनी कोरोनाकाळात सुमारे दीड वर्ष आपल्याकडे असणारे वर्ग ऑनलाइन अथवा ऑफलाईन शिकवलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर शिक्षकाला काही बडे नेते पाठीशी घालत असल्यामुळेच सदर शिक्षकाने गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना न शिकवता अशीच काढली असल्याची चर्चा पाडेगावात आहे.
सुमारे दीड वर्ष कसल्याच प्रकारे विद्यार्थ्यांना न शिकवता सदर शिक्षकाने विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान केले आहे. सदर शिक्षकाची तक्रार काही पालकांनी आवाज उठवल्यानंतर गटशिक्षणाधिकारी रमेश गंभरे यांनी सदर शिक्षकास दोन दिवसात या संदर्भात खुलासा मागवला असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार की राजकीय हस्तक्षेप होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात जाणार याचीच चिंता पालकांना लागलेली आहे.