महा आवास अभियानांतर्गत विभागस्तरीय
पुरस्कारांचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते वितरण
पुणे, कुठलीही व्यक्ती घरविहीन राहता कामा नये असे देशाचे पंतप्रधान यांचे स्वप्न आहे. भारत हा प्रगतीशील देश असून देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. कोणत्याही राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय योजना राबवितांना महाराष्ट्र मागे राहत नाही. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे पुणे विभागातील काम कौतुकास्पद आहे, असे उद्गार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढले.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील 'महा आवास अभियान ग्रामीण' अंतर्गत उत्कृष्ट काम करणा-या जिल्हयांना विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्कार वितरण करण्यात आले, त्यावेळी श्री. राव बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सांगली जि.प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, पुरस्कार प्राप्त तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सभापती, प्रकल्प संचालक तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
श्री. राव पुढे म्हणाले, पुणे विभाग हा सर्वात जास्त प्रगत विभाग आहे. विभागातील विकासाची चाके थांबली की इथल्या माणसाला अस्वस्थ, चुकल्यासारखे वाटते. पुणे विभागाची कार्यसंस्कृती वेगळी आहे. इथे जनप्रतिनिधी व स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे एकत्र येऊन काम करतात. पुणे विभागाला कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वात जास्त सामना करावा लागला. केरळ राज्यातील परिस्थिती पाहता तिस-या लाटेचे सावट आपल्याला दिसत आहे. तिस-या लाटेच्या प्रादुर्भाव झाला तर परिस्थिती कशी हाताळता येईल याविषियीची काळजी आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणा तयार आहेत.
या योजनेत सहभागी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पाटण तालुक्यातील पूरपरिस्थिती सारख्या संकटांवर मात करुन चांगले काम केल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांनी सर्व पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदा, तालुके व ग्रामपंचायतींचे कौतुक करुन अभिनंदन केले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर, पुणे व सातारा यांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृत्तीय पुरस्कारासाठी निवड झाली. तर बावडा (कोल्हापूर), पाटण (सातारा) व राधानगरी (कोल्हापूर) या तालुक्यांची सर्वोत्कृष्ट तालुके म्हणून निवड झाली. सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील नाव ग्रामपंचायतीला प्रथम, पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील टाकवे बु. ग्रामपंचायतीला दुसरा तर सांगली जिल्हयातील खानापूर तालुक्यातील भुद ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत पुणे, सातारा व सांगली जिल्हयांना अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृत्तीय पुरस्कार मिळाला. कागल (कोल्हापूर), खेड (पुणे) व पाटण (सातारा) तालुक्यांना तर पुणे जिल्हयातील भोर तालुक्यातील अंबावडे ग्रामपंचायत, खेड जिल्हयातील वाशेरे ग्रामपंचायत व आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ ग्रामपंचायतीला अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या भोर (पुणे), पाटण (सातारा) व शिरुर (पुणे) तालुक्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
यावेळी विभागीय आयुक्त श्री. सौरव राव यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार उपायुक्त सीमा जगताप यांनी मानले.