पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल
टोकियो येथील पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिला टेबल टेनिसचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेले ऑलिंपिक पदक देशातील युवकांना, दिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडविण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भाविनाबेन पटेल यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत, खडतर परिश्रमांतून देशाला ऑलिंपिक रौप्यपदक जिंकून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ऑलिंपिक रौप्यपदक जिंकण्याचा चमत्कार घडवला आहे. त्यांचं यश हे देशाचा गौरव वाढवणारं आणि देशवासीयांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भाविनाबेन पटेल यांचं कौतुक केलं आहे.