जनाई उजवा कालव्यातून वढाणे तलावात पाणी सोडणे व बारामती वितरिकेतून वाकी तलावात पाणी सोडण्यासाठीच्या आरसीसी पाईपलाईनच्या कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वढाणे येथे मे. रसिकलाल माणिकचंद धारीवाल फांऊडेशन, पुणे यांच्या अर्थ सहाय्यातून जनाई उजवा कालव्यातून वढाणे गावातील तलावात पाणी सोडण्यासाठी व बारामती वितरिकेमधून वाकी तलावात पाणी सोडण्यासाठी आरसीसी पाईपलाईनच्या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी मे. रसिकलाल माणिकचंद धारीवाल फांऊडेशन, पुणेच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता एस.डी.चोपडे, कार्यकारी अभियंता उपसा सिंचन व्यवस्थापक एम.बी.कानिटकर, सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, वढाणे गावचे सरपंच रामदास अंकुश चौधरी व ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मे रसिकलाल माणिकचंद धारीवाल फांऊडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, धारीवाल फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हा प्रकल्प जलसंपदा विभागाच्या सहकार्यातून पूर्ण केला. त्याबद्दल मी बारामतीकरांच्यावतीने त्यांचे कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. हे फांऊडेशन अशाच प्रकारचे सामाजिक काम भारतातील इतर ठिकाणीही करत आहे, ही आनंदाची बाब आहे. या प्रकल्पामुळे वढाणे येथील शेती पाण्याखाली आली असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. रसिकलाल शेठ यांनी फांऊडेशनच्या माध्यमातून जे काम चालू केले होते तेच काम शोभाताई धारीवाल यांनी पुढे चालू ठेवले आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटतो असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी शोभा धारीवाल म्हणाल्या की, अधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहभागाने हा प्रकल्प पुर्ण झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार साहेबांनी हे काम करण्यास मला संधी दिली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आम्ही या फांऊडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व गरजू विद्यार्थ्यांना मदत करत असतो.