सक्रीय कृष्ठरुग्ण, क्षयरोग रुग्ण शोध व नियमीत सर्वेक्षण;अभियान राबविण्याबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न
पुणे, दि. 15 : राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत सक्रीय कृष्ठरुग्ण, क्षयरोग रुग्ण शोध व नियमीत सर्वेक्षण 2021-22 अभियान राबविण्याबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग), पुणे डॉ. एच. ए. पाटोळे, सामान्य रुग्णालय पुणे डॉ. एम. एम. कुलकर्णी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दराडे व समितीचे सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत सन 2021-22 मध्ये पुणे जिल्ह्यातील (ग्रामीण व शहरी) सक्रीय कृष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी दिनांक 1 जुलै 2021 ते मार्च 2022 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक अवस्थेमधील नविन कृष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणे, निदाण झालेल्या रुग्णांना पूर्ण कालावधीचे मोफत औाषधोपचार देणे, विकृती प्रतिबंध करणे, रोगाची साखळी खंडीत करणे हे या अभियानाचे ध्येय आहे.
राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत सन 2021-22 मध्ये जिल्ह्यातील सक्रीय कृष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षणाच्या दोन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. कमी कुष्ठरुग्ण भार असणा-या 11 तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात 1 जुलै 2021 ते मार्च 2022 या कालावधीत होणार आहे. तसेच बारामती व मावळ या दोन तालुक्यात जुलै 2021 ते ऑक्टोंबर 2021 पहिली फेरी तर डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. या अभियानात आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी सहभागी होणार आहेत.