सहकार प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा- आयुक्त अनिल कवडे
पुणे : सहकार प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे निबंधक व सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या १०३ व्या वर्धापन दिनाचे उद्घाटन सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे व मानद सचिव, सौ. विद्याताई पाटील, पुणे साखर संचालनालयाचे सह संचालक डॉ. संजय भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी. यगलेवाड, संघाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर आदी उपस्थित होते.
सहकार आयुक्त श्री.कवडे म्हणाले, कोणत्याही सहकारी संस्थेच्या बाबतीत १०३ वर्षे अविरतपणे चालू राहणे ही भूषणावह बाब आहे. भारतामध्ये लॉर्ड कर्झनच्या काळात पहिला सहकारी कायदा आला. संघाच्या १०३ वर्षाच्या वाटचालीत काय कमावले व काय गमावले हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या काय चूका झाल्यात त्याचा विचार केला पाहिजे.
सहकारी संस्थांमुळेच राज्याचा विकास व माणसाच्या जीवनमानामध्ये बदल झाला आहे. तसेच सहकारामध्ये कुठलीही गोष्ट व्यक्ती सापेक्ष न राहता संस्थात्मक विकास झाला पाहिजे. शिवाजी महाराजांनी जशी माणसे घडविली त्याप्रमाणे सहकारामध्ये शिक्षण प्रशिक्षणाने माणसे घडविण्याचे काम संघाने केले पाहिजे. सहकारामध्ये शिक्षण, प्रशिक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पदाधिकारी, संचालक, अधिकारी व सेवक यांनी आपण सहकारामध्ये जे काम करीत आहे, जे योगदान देत आहे ते मानसिक समाधान देणारे आहे का? याचा विचार केला पाहिजे.
सहकारामध्ये तत्वे व मुल्य खुप महत्वाचे असून ते सभासदांपर्यंत पोहोचविले पाहिजे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून संघाने पारंपरिक पध्दतीने शिक्षण, प्रशिक्षण न देता आधुनिकतेचा वापर करुन दिले पाहिजे. सहकारामध्ये काम करीत असलेल्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानवृध्दी करुन दृष्टीकोन बदलला पाहिजे. सहकारामध्ये प्रत्येकाने कोणतीही गोष्ट मनापासून जीव ओतून केली पाहिजे. संधी खूप आहेत त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रत्येकाने मी संस्थेला काय देणार आहे हे पाहिले पाहिजे. संचालकांचे काम हे विश्वस्थाचे आहे.आत्मचिंतन व आत्मसंशोधनातून चांगला मार्ग सापडतो.
पुणे साखर संचालनालयाचे सह संचालक डॉ. संजय भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संघाला उर्जित अवस्था द्यावयाची असेल तर संघाने प्रशिक्षणामध्ये बदल केला पाहिजे.
कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष रामदास मोरे व मानद सचिव, सौ. विद्याताई पाटील यांनी राज्य सहकारी संघाच्या कामकाजाविषयी व अडीअडचणींविषयी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी. यगलेवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एस.एस. बोडके यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे व श्रोत्यांचे संघाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर यांनी आभार मानले.