दहिवडी कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
नवक्रांती न्यूज नेटवर्क -एकनाथ वाघमोडे
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दहिवडी कॉलेज मध्ये वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य,डॉ.बी.एस.खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयात काही प्रमाणात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.शासकीय नियमांचे पालन करीत उपस्थित शिक्षकवृंद व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे काही मोजके विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. खाडे सर म्हणाले की,पर्यावरणावर केले जाणारे आघात थांबवण्यासाठी व मानवाला निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे,जसे की शासकीय ध्येयधोरणानुसार एखादा जमिनीचा उतारा घेताना त्याच क्षेत्र विचारात घेतल जात,त्याचप्रमाणे त्या क्षेत्राप्रमाणे झाडे लावण्याची सक्ती करायला हवी,जो विचार अहिल्यामाई होळकर यांच्या कारकिर्दीत सर्वांना लागू होता.अध्यक्षीय मनोगतातून बोलताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य,डॉ.बी.एस.बळवंत सर म्हणाले की मानवाला स्वत:चं अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होणारा नाश थांबवावा लागेल आणि त्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे सामजिक बांधिलकीचा भाग म्हणून उपस्थितांना सँनीटायझर,वैद्यकीय गोळ्या व कोरोना आजारावर गुणकारी ठरत असलेल्या गुळवेल या वेलाच्या मुळ्या देण्यात आल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य,डॉ.बी.एस.बळवंत,इंग्रजी विभागप्रमुख,डॉ.ए.एन.दडस सर,वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख,डॉ.कांबळे सर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी,प्रा.के.एस.शिंदे, यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागाचे प्राध्यापक,प्राध्यापिका,ग्रंथालय प्रमुख तसेच महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.