खोट्या ठरावाद्वारे फसवणूकप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल
खोट्या ठरावाद्वारे फसवणूकप्रकरणी रामचंद्र भोसले यांच्यावर गुन्हा दाखल
तरडोली (ता.बारामती) येथील हनुमान विकास सोसायटीशी कोणताही संबंध नसताना तरडोलीमधील रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी खोटे शिक्के, बनावट लेटरपॅड, खोट्या सह्या करून सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी सोसायटी प्रतिनिधी म्हणून स्वतःच्या नावाचा खोटा ठराव केला. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी रामचंद्र भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात हनुमान सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप धायगुडे यांनी वडगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वास्तविक २०१९ मध्ये धायगुडे यांच्या नावाचा ठराव संबंधित संस्था यांनी सोमेश्वर साखर कारखाना निवडणूकीसाठी मतदानासाठी प्रतिनिधी म्हणून पाठवला होता. मात्र, प्रत्यक्षात मतदारयादीत रामचंद्र विठ्ठल भोसले यांचे नाव आले. धायगुडे यांच्यासह संचालक मंडळ यांनी यासंदर्भात सोमेश्वर साखर कारखाना आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग पुणे यांच्याकडे चुकीचे नाव आले कसे याची विचारणा करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी खोटे शिक्के, खोट्या सह्या आणि खोटे लेटरपॅड वापरून भोसले यांनी स्वतःच्या नावाचा मतदान प्रतिनिधी म्हणून खोटा ठराव कारखाना आणि निवडणूकीसंदर्भात पुढील यंत्रणा यांच्याकडे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. दरम्यान, धायगुडे यांच्या नावचा ठराव कोणी, कुठे आणि कसा गहाळ केला हे आजही गुलदस्त्यात आहे कारखान्याने भोसले यांचा ठराव खरा समजुन त्यांच्या नावाचा समावेश मतदार यादीत केला.भोसले यांनी फिर्यादीसह हनुमान विकास संस्था, सोमेश्वर कारखाना आणि प्रादेशिक सहसंचालक साखर विभाग पुणे यांची एका वेळी फसवणूक केली आहे. शिवाय धायगुडे यांचा कारखाना निवडणूकीसाठी मतदान करण्याचा हक्कही हिरावून घेतला आहे. यासंदर्भात वडगाव पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.दरम्यान, २००९ मध्ये कर्जमाफी काळात हनुमान विकास संस्था यांचे सचिव म्हणून रामचंद्र भोसले काम करत होते. त्यावेळी कर्जमाफी मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांकडून कर्जाची रक्कम वसूल करून ती बॅंकेत न भरता त्याचा अपहार करण्याचा प्रकार भोसले यांनी केला होता. शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात न्याय मागण्यासाठी धाव घेतली होती. खुद्द पवार यांनी याप्रकरणी भोसले यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज पुन्हा त्याच सोसायटीचा भोसले यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी खोटा ठराव करून केलेली फसवणूक तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
दरम्यान भोसले यांना आज बारामती न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.