Type Here to Get Search Results !

आर्थिक अडचणी मध्ये सापडलेल्या एसटीला शासनाची ६०० कोटी रुपयांची मदत :परिवहन मंत्री अनिल परब

आर्थिक अडचणी मध्ये सापडलेल्या एसटीला शासनाची ६०० कोटी रुपयांची मदत :परिवहन मंत्री अनिल परब 
मुंबई 

आर्थिक अडचणी मध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाल राज्य शासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे. तसेच या मदतीबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे मंत्री, परब यांनी आभार मानले आहेत.

कोरोना महामारी मुळे राज्यात १५ एप्रिल पासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. एसटीला केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ५०% आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते. त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवणे देखील एसटीला शक्य नव्हते. यासाठी मंत्री परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचा-यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी मान्य केले. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, अर्थ व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष् व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

यापूर्वी देखील मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडुन तब्बल १ हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवुन दिले.त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले. अर्थात, शासनाने दिलेल्या आर्थिक निधी बरोबरच मंत्री, परब यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीने देखील आपले उत्पनाचे नवनवे स्त्रोत विकसित करण्यावर भर दिला आहे.

१. एसटीच्या मालवाहतूकीला सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध १७ विभागांच्या एकूण मालवाहतूकी पैकी २५ % मालवाहतूक एसटीच्या “महाकार्गो” ला मिळाली आहे.

२. सामान्य माणसांना पेट्रोल-डिझेल अथवा सीएनजी पेट्रोल पंप एसटी महामंडळातर्फे सुरू करण्यात येणार आहेत. विविध पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकृत विक्रेते म्हणून एसटी महामंडळ या व्यवसायात उतरत असून,या व्यवसायातून एक शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत एसटी महामंडळाला निर्माण झाला आहे.

३. व्यावसायीक तत्वावर अवजड वाहनांच्या टायर पूनॆ: स्थिरीकरण प्रकल्प.

४. शासनाच्या विविध विभागांच्या वाहनांची तांत्रिक देखभाल करणे.

५. प्रवाशांना “नाथजल” च्या माध्यमातून शुद्ध बाटलीबंद पाणी देण्याची योजना.

६. महामंडळाच्या अधिकृत जागांचा बांधा-वापरा हस्तांतरित करा या तत्वावर व्यवसायिक वापर करण्याचा प्रकल्प.

अशा विविध मार्गाने उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण करून, एसटीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न मंत्री ॲड. अनिल परब यांच्या कुशल नेतृत्वाखाली एसटी महामंडळातर्फे केला जात आहे. “येत्या काही वर्षांमध्ये या वेगवेगळ्या प्रयत्नातून एसटी आर्थिक दृष्ट्या सक्षमपणे उभी राहील.” असा विश्वास यावेळी मंत्री परब यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test