शाळा-महाविद्यालये-धार्मिक स्थळे बंदच..
मुंबई : राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू असलेले निर्बंध पाच स्तरांत शिथिल करीत सरकारने जनतेला दिलासा दिला आहे.
त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी शाळा-महाविद्यालये आणि सर्व धार्मिक स्थळे मात्र बंदच राहणार असल्याचे सरकारने सोमवारी स्पष्ट केले.
तसेच साप्ताहिक बाधितांचे प्रमाण आणि प्राणवायुयुक्त खाटांची उपलब्धता याच्या आधारे प्रत्येक शुक्रवारी शहर अथवा जिल्ह्य़ाचा स्तर निश्चित करावा आणि सोमवार ते रविवार त्याची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.
राज्यात एप्रिल महिन्यापासून कठोर निर्बंध लागू आहेत.
गेल्या काही दिवसांत बाधितांच्या प्रमाणात झालेली घट आणि या आजारावर मात करणाऱ्यांच्या प्रमाणात झालेली वाढ एकूणच राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आल्यानंतर सरकारने सोमवारपासून निर्बंध काही प्रमाणात शिथिल के ले आहेत.
मात्र करोनाचा धोका अजून टळलेला नसल्याने धार्मिक स्थळे तसेच शिक्षण संस्था बंदच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी दिली.
शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा घेणे, प्रार्थना स्थळे, खासगी शिकवणी वर्ग, कौशल्याचे वर्ग, खेळांच्या स्पर्धा, धार्मिक-सामाजिक-राजकीय सार्वजनिक कार्यक्रम याबाबत ४ जूनपर्यंत जे निर्बंध होते, तेच कायम राहतील. याबाबत कोणतीही सवलत देण्यात आलेली नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
करोनाशी संबंधित आवश्यक सेवा, लसीकरण, जनजागृती मोहीम यासारख्या कामासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल.