खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
विशेष बातमी
या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पिक कर्ज वाटप करुन सर्वसमान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बॅकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
येथील नियोजन भवनात खरीप हंगाम 2021 पीक कर्ज पुरवठा, शेती विद्युत पंप व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मरकंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचे कर्जाची प्रकरणे मंजूर करावेत, अशा सूचना करुन, तौक्ते वादळामुळे विद्युत वितरण कंपनीचे विद्युत पोल पडले आहेत ते तात्काळ दुरुस्त करुन गावांमधील खंडीत झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरु करावा.
तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणेनी सज्ज रहावे
तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तशी तयारी करावी. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहावे. तसेच ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, घाबरुन त्यांचा मृत्यु ह्दय विकाराने झाला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग झाल्यास न घाबरता वेळेत औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचे शेती विद्युत पंप वीज कनेक्शन प्रलंबीत आहे, अशा प्रलंबीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर विज कनेक्शन द्यावे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करावा. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या अनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.
खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मरकंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
जिल्हा अग्रणी बॅकेने तयार केलेल्या 9 हजार 275 कोटीच्या वार्षिक पतआराखडा पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, अधीक्षक अभियंता गौतम गाकयावाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.