एका क्लीकवर मिळणार रुग्णालय व बेडची माहिती: किरण गुजर
बारामतीत आता एका क्लिकवर घरबसल्या कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांची, तेथील बेडसह अन्य सुविधांची माहिती मिळणे शक्य होणार आहे. कोरोनाग्रस्तांसाठी गेल्या वर्षभरापासून काम करणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळाने त्यासाठी पुढाकार घेत वेब पोर्टल विकसित केले आहे. बारामतीकरांना त्याद्वारे उपलब्ध बेडसह अन्य माहिती सहजपणे मिळणार आहे.
नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी ही माहिती दिली. याचा उपयोग कोरोनाबाधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशी माहिती एकाच ठिकाणी मिळावी, अशी मागणी होत होती. त्यासाठी नटराज नाट्य कला मंडळ यांच्यावतीने माहिती केंद्र सुरू करण्यात आले असून यामध्ये
http://dashboard.covidcarebaramati.com
वेब पोर्टलवर क्लिक केल्यास बारामती शहरामध्ये कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असणारे शासकीय व खासगी रुग्णालये, तेथील उपलब्ध बेड, डॉक्टरांचे क्रमांक, कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांसाठीचे रुग्णालय, कोरोनाग्रस्त बाल रुग्णालये, कोविड केअर सेंटरची माहिती, संपर्क क्रमांक उपलब्ध होणार आहेत.
त्याचप्रमाणे बारामतीतील कोरोना चाचणी केंद्रांची नावे व माहिती यात देण्यात आली आहे. याशिवाय बारामती शहरांमध्ये कोविडबाबत घडणाऱ्या रोजच्या घडामोडी तसेच बारामती शहरात लसीकरण केंद्र कुठे आहे, लस कधी उपलब्ध होईल याबाबतची अधिक माहिती व या संदर्भातील केंद्राचे आवश्यक ते संपर्क क्रमांक, कोविड रुग्णांकरिता रुग्णवाहिका सेवा, रुग्णवाहिकांसाठीचे संपर्क क्रमांक, कोरोनाने मृत झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी असणाऱ्या सेवेचा फोन नंबर यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. गरजू व्यक्तींनी
७३८७९६००००
या हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क साधता येईल, असे गुजर यांनी सांगितले.
कोरोनाबाधितांना अनेकदा बेडसाठी धावाधाव करावी लागते. वेबपोर्टलद्वारे त्यांना ही माहिती सहजपणे उपलब्ध होईल. हे पोर्टल सतत अपडेट राहणार असल्याने त्यावर अद्ययावत माहिती असेल.
-किरण गुजर नगरसेवक बारामती-