********************************
२० मे - मल्हारराव होळकर स्मृतिदिन
जन्म - १६ मार्च १६९३ (जेजुरी)
स्मृती - २० मे १७६६ (आलामपूर)
पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारा मूळ पुरुष मल्हारराव होळकर.
मल्हारराव होळकर यांचं गाव पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा होता. तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनत असे.
दाभाड्यांचा सरदार कंठाजी कदमबांडे याच्या पेंढारी टोळीत मल्हाररावांनी शिपाई म्हणून काम केलं. याच काळात बाजीराव पेशवे आणि मल्हारराव यांची मैत्री झाली. यानंतर मल्हाररावांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांनी शिपाई ते थेट सरदार असा प्रवास केला. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली.
१७२८ ची निजामाबरोबरची महत्वाची लढाई असो किंवा १७३७ ची दिल्लीची लढाई असो, तसेच १७३८ सालची भोपाळची लढाई असो मल्हाररावांची समशेर कायम तळपत राहिली. त्यांचा दबदबा तयार झाला आणि त्यांना ‘किंग मेकर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच काळात इंदोरची रियासत होळकर घराण्याकडे आली.
मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान म्हणजे ‘अटके पार झेंडा’. पाकिस्तानातील अटक पर्यंत भगवा झेंडा जाऊन पोहोचला होता. यात राघोबादादांबरोबर खांद्याला खांदा भिडवून मल्हारराव आघाडीवर होते. अटक काबीज करण्याआधी १७५८ साली सरहिंद आणि लाहौर देखील काबीज करण्यात आलं होतं. या नंतर एक म्हण मराठीत कायमची रुजली, "अटके पार झेंडा रोवणे".
१६ जानेवारी १७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संक्रांत कोसळली. या महत्वाच्या लढाईत मल्हारराव पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांनी केला आहे. पण काही इतिहासकारांच्या मते जेव्हा पानिपत मध्ये पराभव स्पष्ट दिसत होता तेव्हा सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी त्यांच्या पार्वती बाईंना यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती मल्हाररावांकडे केली. त्यानुसार ते पार्वती बाईंना घेऊन निघून गेले. यानंतर सदाशिवराव भाऊ यांना मृत्यूने गाठले.
या आरोपाबरोबर त्यांच्यावर आणखी एक आरोप केला जातो तो म्हणजे ज्या नजीब खानाने अहमदशहा अब्दालीला भारतात बोलावलं आणि पानिपत घडलं त्या नजीब खानाला मल्हाररावांनी आपला दत्तक पुत्र मानला होता. नजीब खानाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला माफ केलं. हाच नजीब खान पुढे जाऊन मराठा साम्राज्याच्या उरावर बसला होता.
पानिपत नंतर स्वराज्य पुन्हा उभारण्याच्या हेतूने त्यांनी अनेक मोहिमा आखल्या. तो पर्यंत नानासाहेब पेशव्यांचे धाकटे चिरंजीव ‘माधवराव’ पेशवे झाले होते. या मोहिमांच्या धामधुमीतच आलामपूर येथे मल्हारराव होळकर यांचे २० मे १७६६ रोजी निधन झाले.
संदर्भ : इंटरनेट