"समाजसेवा"व्हाॅटसॲप गृपने कोविड सेंटरसाठी अवघ्या चोवीस तासांत तब्बल सव्वालाख रूपये केले जमा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोशल मिडीया गृपवरून कोविड सेंटर साठी चोवीस तासांत जमवला लाखांचा निधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एका व्हाॅटसॲप गृपने कोविड सेंटरसाठी अवघ्या चोवीस तासांत तब्बल सव्वालाख रूपये ऊभे करून सोशल मिडीयाची ताकद खऱ्या अर्थाने दाखवून दिली आहे.हल्ली सगळीकडेच सोशल मिडीयाचा बोलबाला झालेला दिसून येतो. याचे जसे तोटे आहेत तसेच कोरोना काळात अनेक फायदे देखील दिसून आले आहेत. बारामती तालुक्यातील निंबूत येथील शेतकरी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस मदनराव काकडे यांनी २०१४ साली सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने “समाजसेवा” हा व्हाॅटसॲप गृप उघडला. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सह राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक , शेतकरी, पत्रकार अशा सर्वांना एकत्र आणून नेहमीच सामाजिक तसेच शेतकरी हितासाठी चर्चा घडवून आणली. मागील वर्षी पासून वाढत असलेल्या देशभरातील कोरोना समस्येच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जे कोविड विलगीकरण कक्ष बनवले जात आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने समाजसेवा गृपचे सदस्य जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे यांनी गृपच्या माध्यमातून नीधी उभारण्याची कल्पना मांडली. या कल्पनेला गृपचे ॲडमीन मदनराव काकडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गृपच्या सदस्यांना यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत गृपच्या सदस्यांनी चोवीस तासाच्या आत तब्बल एक लाखापेक्षा जास्त निधी गोळा करून सुखद धक्का दिला.
सोशल मिडीयाच्यामाध्यमातून गोळा झालेला सुमारे सव्वालाखांचा निधी परिसरातील कोविड सेंटरला मदत म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी गृपमधील मान्यवर सदस्यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. यामधे ज्यांच्या कल्पनेतून हा निधी उभारण्याची सुरवात झाली ते जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे पत्रकार संतोष शेंडकर ,पत्रकार महेश जगताप, डाॅ राहुल खरात, प्रमोद पानसरे , गौतमभैय्या काकडे , राजेंद्र बापु धुमाळ , अनिलदादा जगताप ,दिलीपआप्पा खैरे , सचिन टेकवडे , डॉ. सौरभ काकडे , टि.के. जगताप (आण्णा) , संग्राम शहाजीराव जगताप , राजकुमार केरबा बनसोडे , योगिराज कांतिलाल काकडे यांच्या समावेश करण्यात आला आहे. या कमिटीच्या माध्यमातून परिसरातील दहा कोविड सेंटरला आवश्यकतेनुसार येत्या दोन दिवसांत मदत दिली जाणार आहे.