बारामतीत आणखी सात दिवसांचा लॉकडाऊन : प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीत सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आज दुपारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात सर्वंकष चर्चा झाली. सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली असून, आणखी सात दिवस हा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यामध्ये उपस्थित पदाधिकारी व व्यावसायिक उद्योजक यांच्या चर्चेनंतर लॉकडाऊन पुन्हा सात दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा मात्र घरोघरी पोहोच करण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे. यामध्ये किराणा व भाजीपाला साहित्याचा समावेश आहे. दूध वितरण सकाळी सात ते नऊ दरम्यान होणार आहे. दवाखाने व मेडिकल वगळता इतर सर्व सेवा मागील लॉकडाऊन प्रमाणेच बंद राहतील.
मागील आठवड्यात बारामतीत लॉकडाऊन करतेवेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी रुग्णसंख्या कमी झाली व आटोक्यात आली तर पुढील सात दिवस लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय प्रशासन घेईल असे स्पष्ट केले होते. आज झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी यांनी आणखी ७ दिवस कडक लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा केली. बारामतीत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यानंतर प्रशासनाला संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला.